भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर

भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर

>> वर्षा चोपडे

आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजाची राजधानी होती. या भागात पूर्वी घनदाट जंगल असावे. बाजूला कोचीन युनिव्हर्सिटी आहे. आजूबाजूला घरेही आहेत, पण हे मंदिर दोन सहस्र वर्षांपूर्वीचे आहे असे म्हटले जाते. विष्णू देवतेला समर्पित असलेले हे मंदिर भव्य आहे आणि आजही राजघराण्याद्वारे येथे विशेष पूजा केली जाते. शेजारी तेवढेच आकर्षक शिवमंदिर आहे. एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.

बळीराजा आणि वामन अर्थात भगवान विष्णू यांची गोष्ट  सर्वश्रुत माहीत आहे, पण या वामन देवतेचे  मंदिर कुठे आहे, याबाबत खूप कमी लोकांना माहिती असावी. राजगिरी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला असलेले हे भव्य वामन मंदिर अर्थात थ्रिक्काकर-अप्पन मंदिर मला आकर्षित करायचे. मुंबईला जरी पोस्टिंग मिळाली तरी या मंदिराचा भव्यपण व सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत मनातून जात नाही. थ्रिक्काकर मंदिर हे ओणम उत्सवाचे केंद्र मानले जाते. कारण कोची शहरातील थ्रिक्काकर हे राजा महाबली यांचे निवासस्थान मानले जाते.

 हिंदुस्थानला  स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्रावणकोरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली 61 नादुवजी (स्थानिक शासक) यांनी ओणम उत्सवाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. जातीय सलोखा हा उत्सव साजरा करण्याचे वैशिष्टय़ आहे. उत्सवाच्या भावनेनुसार ओणसद्य किंवा ओणम मेजवानीसाठी विविध धर्मांचे लोक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. विष्णुमूर्ती असुर राजा महाबलीवर पाय ठेवत असलेल्या मुद्रेत आहे. मूर्तीचा चेहरा प्रसन्न आणि देखणा आहे. परशुरामाने मंदिराची स्थापना केल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात 861 सालच्या ओणम उत्सवाच्या सर्वात जुन्या उल्लेखांच्या नोंदीदेखील आहेत. मूर्तीची सजावट  मुख्यत चंदनाची पेस्ट, दागिने आणि कपडे वापरून केली जाते.

प्रत्येक दिवशी विष्णू देवतेला  मत्स्य (मासे), कूर्म (कासव), वराह (डुक्कर), नरसिंह (अर्धा मानव अर्धा सिंह), वामन, परशुराम, राम, बलराम, कृष्ण, कल्की आणि त्रिविक्रम (वामनाचे दुसरे रूप) यांसह विष्णूच्या दहा अवतारांपैकी एकाच्या रूपात सजवले जाते. ओणम उत्सवात मंदिरात चक्यर कुथू, ओट्टमथुल्लाल, कथकली आणि पटकमसारख्या अनेक सांस्कृतिक कलांचे तसेच पंचवाद्यम आणि थायंबका नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले जाते. इतर वेळी येथे पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या प्रशासनाखाली आहे. मंदिराच्या जवळ दोन मोठे तलाव आहेत. आतमध्ये गोडय़ा पाण्याची विहीर आहे.

दरवर्षी ओणम उत्सवात जुना ध्वज काढून नवीन ध्वज  चढवण्यात येतो. मूर्तीला हत्तीवर बसून तलावाजवळ नेण्यात येते तेथे विधिवत पूजा होते. साऱ्या मंदिराभोवती नेहमीप्रमाणे दिवे लावले जातात. पारंपरिक वाद्यांचा गजर होतो. अनेक भक्त त्याकरिता मदत करतात. दिव्याच्या रोषणाईने मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघते. पारंपरिक पांढऱ्या, सोनेरी पोशाखात सजून महिला-पुरुष,  लहान मुले-मुली सामील होतात. वामन मंदिराच्या उपदेवता म्हणजे भगवती, सस्थवू, गोपालकृष्ण, नाग, ब्रह्मराक्षस आणि यक्षी. ब्रह्मराक्षस मंदिराबाहेरील संकुलात वटवृक्ष देवता आणि सर्पदेवता विराजमान आहेत.

भागवत पुराणात वर्णन केले आहे की विष्णुदेवतेने  स्वर्गावर इंद्राचा अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी वामन देवतेच्या  रूपात अवतार घेतला होता.  कारण परोपकारी असुर राजा बळी याने स्वर्ग ताब्यात घेतला होता. बळी हा विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हाद याचा नातू होता. राजा बळी उदार होता आणि कठोर तपस्या आणि तपश्चर्येत गुंतला होता. त्याने आपल्या परोपकाराने आणि शूरपणामुळे जगाची प्रशंसा मिळवली होती. असे म्हणतात,  इतरांकडून मिळालेल्या कौतुकामुळे तो स्वत:ला जगातील सर्वशक्तिमान राजा मानत असे आणि ते सत्य होते.

इंद्राला त्याचे राज्य परत मिळावे म्हणून ताडपत्राची छत्री घेऊन एका लहान ब्राह्मणाच्या वेषात वामन, बळीराजाकडे तीन पावले जमीन मागण्यासाठी गेला. राजा बळी उदार होता. देवावर त्याची प्रचंड आस्था होती. राजा बळीने त्याच्या गुरू शुक्राचार्य यांच्या इशाऱ्याला न जुमानता होकार दिला. त्यानंतर वामनाने आपली ओळख प्रकट केली आणि तीन पावले जमीन मागितली. वामनाने तिन्ही लोकांवर पाऊल ठेवण्यासाठी प्रचंड भव्य रूप घेतले. त्याने पहिले पाऊल स्वर्गातून पृथ्वीवर टाकले आणि दुसरे पाऊल पृथ्वीवरून पाताळात टाकले. राजा बळी आपले वचन पूर्ण करू शकला नाही. त्याने तिसऱ्या वेळी  आपले डोके वामनासमोर केले. त्यानंतर वामनाने आपला  पाय त्याच्या डोक्यावर ठेवला आणि राजाला त्याच्या नम्रतेसाठी अमरत्व दिले. वामनाने महाबली आणि त्याचे पूर्वज प्रल्हाद यांची पूजा करून आशीर्वाद मागितले आणि वामनाने त्याचे  सार्वभौमत्व मान्य केले. काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की, वामनाने बळीराजाच्या  डोक्यावर  पाऊल ठेवले नाही, तर त्याची केवळ परीक्षा घेतली. त्यानंतर  त्याचे राज्य बळीला परत दिले व त्याला पुढील इंद्र होण्याचे वरदान दिले. याबाबत मतभेद आहेत. महाकाय स्वरूपात असलेल्या  वामनाला त्रिविक्रम म्हणून ओळखले जाते. ही आख्यायिका उलागलंथा पेरुमल मंदिर, तिरुकोयिलूर मंदिर, उलागलंथा पेरुमल मंदिर, कांचीपुरम आणि काझीराम विन्नगरम, सिरकाझी या मंदिराशीदेखील संबंधित आहे.

या थ्रिक्काकारा मंदिरातील उत्सवाचा समारोप म्हणजे ध्वज खाली उतरवणे आणि मूर्तीला आंघोळ घालणे. याला आरत्तू असे संबोधले जाते. खजुराहोला वामन मंदिर आहे, पण ते या मंदिरासारखे फार प्राचीन नाही. राजा बळीला दुष्ट राजा म्हणून चित्रित का गेले, याचे उत्तर नाही, परंतु काही पौराणिक कथांनुसार तो एक दानशूर आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जात असे. त्याच्या राज्याला स्वर्गासारखे मानले जात होते आणि त्याच्या राज्यात कोणताही अन्याय किंवा दुःख नव्हते. दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदा म्हणजेच बळीचा पाडवा  म्हटलं की,  आपल्याला बळीराजा आठवतो. त्याला ‘बळी’ किंवा ‘महाबली’ या नावानेही ओळखले जाते. त्याच्या राज्याचा उल्लेख ‘बळीचे राज्य’ असा केला जातो, जो ‘इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या प्रसिद्ध वाक्यात आजही वापरला जातो. नाशिक शहरात बळीराजाचे एकमेव मंदिर आहे. पुराणात जे लिहिले त्याला अनुसरून हा लेख आहे. सत्य काही का असेना, पण परशुरामाने स्थापन केलेले  दक्षिणेतील हे वामनमूर्ती मंदिर अत्यंत सुंदर,भव्य आणि नक्षीदार असून तेथील पावित्र्य अनुभवायला काहीही हरकत नाही.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात, या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात, या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. निरोगी राहाण्यासाठी तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा...
प्रोफेसर शरीरसंबंधासाठी वारंवार जबरदस्ती करत होता, विद्यार्थिनीने कॉलेज कँम्पसमध्येच उचलले टोकाचे पाऊल
IND Vs ENG 3rd Test – मोहम्मद सिराजचा घातक चेंडू आणि इंग्लंडचा कर्णधार मैदानातच झोपला, Video व्हायरल
महाराष्ट्रातील भाजप युतीचे सरकार चोरीचे, संविधान बदलू देणार नाही – इम्रान प्रतापगढी
Crime News – दमून आलेला पती मुलांच्या शेजारी झोपला, डाव साधत पत्नीने गळा चिरला
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागे भाजपच्या गुंडांचा हात, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
वकील प्रेयसीला भेटायला बोलावलं, मग विवाहित प्रियकराने जे केलं त्यानंतर सारंच संपलं!