भाजप आणि संघावर व्यंगचित्र काढले, हेमंत मालवीय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि पंतप्रधानांचे व्यंगचित्रे बनवणाऱ्या व्यंगचित्रकारा विरुद्ध संघाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार केली आहे. हेमंत मालवीय असे व्यंगचित्रकाराचे नाव आहे. आरएसएस कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी इंदूर येथील व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरएसएस कार्यकर्ते आणि वकील विनय जोशी यांनी लासुडिया पोलिस ठाण्यात व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. बुधवारी रात्री ही तक्रार दाखल करण्यात आली. हेमंत मालवीय यांचे व्यंगचित्र आक्षेपार्ह आणि अश्लील आहे. त्यांनी हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याऱ्या आणि आरएसएसची प्रतिमा खराब करणाऱ्या असल्याचा आरोप विनय जोशी यांनी केला आहे.
फेसबुक पेजवर पोस्ट केले व्यंगचित्र
हेमंत मालवीय यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर काही कार्टून चित्र, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. यामध्ये भगवान शंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचा उल्लेख होता. यावर आरएसएसने आक्षेप घेतला असून व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे कलम 196, 299 आणि 352 अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे इंदूर पोलिसांनी सांगितले. मात्र, मालविया यांना अद्याप अटक केलेली नाही. यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
कोण आहेत हेमंत मालवीय ?
हेमंत मालवीय हे इंदूर येथील एक व्यंगचित्रकार आहेत. तसेच ते लग्नसमारंभातील व्यवस्थापनासाठीही ते काम करतात. हेमंत नेहमीच त्यांच्या कलेतून अनेक राजकिय नेते आणि चालू घडामोडींवर व्यंगचित्र सादर करतात. त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर त्यांचे 40 हजार फॉलोअर्स आहेत.
मालवीय यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, उत्तराखंड पोलिसांनी 2022 मध्ये योगगुरू रामदेव बाबा यांचे अश्लील पोस्टर्स तयार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनानंतर बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल इंदूर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List