अशोक आणि रंजना बाहेर पडा..; नाशिकच्या हॉस्पिटलमधील अशोक सराफांचा ‘तो’ किस्सा
सिनेसृष्टीत काम करायला लागल्यावर चाहत्यांचं सेलिब्रिटींच्या आयुष्यात येणं अपरिहार्य असतं. किंबहुना चाहते हे कलाकाराच्या अस्तित्वाचाच अविभाज्य भाग असतात. ते नसले तर कलाकारालाही फारसा अर्थ राहत नाही. कारण सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचं मूल्यमापनच त्यांच्या चाहत्यांच्या जीवावर होत असतं. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या याच लोकप्रियतेचा अनुभव वारंवार आला. तर ‘पांडु हवालदार’ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी पहिल्यांदा त्यांना त्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु इतकी वर्षं या क्षेत्रात वावरल्यानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारचे चाहते पाहिल्यानंतर प्रत्येक चाहता वेगळा असतो, असं अशोक सराफ यांचं मत आहे. काही जण नम्र असतात तर काहीजण आक्रमक. असाच एक किस्सा त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितला आहे. हा किस्सा अभिनेत्री रंजना यांच्यासोबतचा आहे.
‘दैवत’ या चित्रपटाचं नाशिकमध्ये शूटिंग सुरू होतं. त्यावेळी अशोक सराफ यांच्यासोबत रंजनासुद्धा होत्या. हे दोघं एका हॉस्पिटलच्या सीनचं शूटिंग करत होते. हा सीन सुरू झाला आणि थोड्या वेळाने हॉस्पिटल बाहेरून गलका ऐकू यायला लागला. आरडाओरड सुरू झाली होती. शूटिंगमध्येही आवाजाचा अडथळा येऊ लागला होता. हॉस्पिटलच्या बाहेर माणसं गोळी झाली असणार याचा अंदाज त्यांना आला होता. लोक रंजना आणि अशोक सराफ यांच्या नावां बेंबीच्या देठापासून हाका मारत होते. त्यावेळी दोघंही लोकप्रिय कलाकार होते. त्यामुळे दोघांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती.
‘ए अशोक, बाहेर ये..’, ‘अशोक आणि रंजना बाहेर पडा..’, असे आवाज यायला लागले. काही वेळानं खिडक्यांवर दगड येऊन आदळले. सेटवरील सर्वजण जागच्या जागी स्तब्ध झाले होते. शेवटी दिग्दर्शकांनी अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं. लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग तो जमाव शांत झाला.
अशोक सराफ यांना त्यांच्या आयुष्यात अशा अनेक प्रकारच्या चाहत्यांचे अनुभव आले. ‘पांडोबा पोरगी फसली’ या चित्रपटाचा प्रीमियर जेव्हा पुण्याच्या विजय टॉकीजमध्ये झाला, तेव्हा अशोक सराफ यांच्यासाठी बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी जमली होती. त्यावेळी अशोक सराफ एवढे लोकप्रिय असतील याची कल्पना निर्मात्यांनाही नव्हती. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खास गाडीची व्यवस्था केली नव्हती. त्यावेळी विलास रकटे अशोक सराफ यांच्यासोबत होते. त्यांच्या मागून गेटबाहेर येऊन अशोक मामा कसेबसे एका रिक्षात बसले. तेव्हा लोकांनी रिक्षालाही गराडा घातला होता. काही जण रिक्षावर चढू पाहत होते. अखेर रिक्षावाल्याने कशीतरी तिथून रिक्षा बाहेर काढली. चाहत्यांचं प्रेम असंही असतं, याचा पहिला अनुभव अशोक सराफांना त्यावेळी आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List