तर या दोघांना भुजबळांची ‘मांडी’ खाजवावी लागणार, ‘सामना’तील मांडी पुराणातून महायुतीचे वाभाडे
छगन भुजबळ यांची पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात एंट्री झाली. धनंजय मुंडे यांच्या रिक्त खात्यावर भुजबळांची वर्णी लागली. त्यांनी काल छोटेखानी कार्यक्रमात राजभवनात शपथ घेतली. त्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तर आज सामनातील अग्रलेखातून तुफान फटकेबाजी करण्यात आली. या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली.
दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागणार
सामनातील अग्रलेखातून या शपथविधीचा आणि राजकीय घडामोडीवर भाष्य करत निशाणा साधण्यात आला आहे. “फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी’ नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे. त्यामुळे स्वत:ची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल.” असा घणाघात सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंना वेदना कशा होत नाही
“उपमुख्यमंत्री मिंधे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे व त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हैदोस घातला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले आहे व एकनाथ मिंधे यांना यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते.
शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला. भुजबळ यांच्या शपथविधी सोहळय़ाला शिंदे-मिंधे यांनी हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा मिंधे व त्यांच्या लोकांना इशारा आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला घेतले नव्हते तेव्हा त्यांनी मोठा थयथयाट केला. ओबीसी समाजावर हा अन्याय केल्याचे त्यांचे म्हणणे होते. ‘‘आता मी गप्प बसणार नाही. महाराष्ट्रात रान उठवीन,’’ असा त्यांनी आव आणला. प्रत्यक्षात रान वगैरे उठले नाही व रान उठविण्यासाठी उभे राहिलेले भुजबळ फडणवीस यांच्या सांगण्यावरून शांत बसले.” असा घणाघात सामनातील अग्रलेखातून घालण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List