कल्याणच्या गांधारी पुलावर ट्रकची रिक्षाला धडक; महिला ठार, मुलगा गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात
गांधारी पुलावर मंगळवारी सकाळी एक विचित्र असा भीषण अपघात घडला. भरधाव असलेल्या हायवा ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षामधील महिला मंगला वानखेडे (55) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा नीलेश वानखेडे (35) हा गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नीलेश वानखेडे आई मंगला वानखेडे यांना घेऊन बापगावहून कल्याणकडे रिक्षाने निघाले होते. गांधारी पुलावर रिक्षा पोहोचताच समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या रिक्षाला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शीनी तत्काळ खडकपाडा वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या मदतीसाठी नीलेश हाका मारत होता. मात्र मदतीसाठी पुढे येण्याऐवजी नागरिक फक्त मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढण्यातच गुंतले होते.
सावधगिरी बाळगून ट्रकचालकाने उडी मारली
ट्रकचालक आझम अली याने अपघाताच्या क्षणी सावधगिरी बाळगून ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला. त्याच्या हातापायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List