खटल्याच्या दोन तारखा चुकवल्यास जामीन रद्द; हायकोर्टाने घातली अट, दोन वर्षांनंतर आरोपीची सुटका
खटल्याच्या दोन तारखांना सलग गैरहजर राहिल्यास जामीन रद्द होईल, असे बजावत उच्च न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला.
विनोद वाघेला, असे या आरोपीचे नाव आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा विनोदवर आरोप आहे. गेली दोन वर्षे 8 महिने मी कारागृहात आहे. खटल्यात काहीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी करत विनोदने न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर विनोदच्या जामिनावर सुनावणी झाली. या फसवणुकीतील मुख्य आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. परिणामी विनोदला कारागृहात ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही, असे नमूद करत न्या. जाधव यांनी त्याला 25 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. या खटल्यात अद्याप काहीही प्रगती नाही. खटला कधी संपेल याची शाश्वती नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
आठ लाखांची फसवणूक
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत तक्रारदाराकडून तब्बल आठ लाख रुपये मुख्य आरोपीने घेतले. विनोदने सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र व अन्य कागदपत्रे तयार करून तक्रारदाराला दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. ऑगस्ट 2022 मध्ये विनोदला पोलिसांनी अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List