अमेरिकेत क्रूरतेचा कळस! काकासारखा दिसतो म्हणून तरुणाने अज्ञात व्यक्तीला भोसकलं
अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन भागात एका बसमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या एका उद्योजकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही घटना 14 मे रोजी सायंकाळी घडली आहे. मुख्य म्हणजे या घटनेत हत्या करणारा आरोपीही हिंदुस्थानी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन त्याला तातडीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय गुप्ता (30) या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक कंडेल (31) असे आरोपीचे नाव आहे. अक्षय आणि दीपक हे दोघेही एकाच बसने प्रवास करत होते. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी दीपकने अचानक कोणतेही कारण नसताना अक्षयच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. आणि पुढच्या स्टॉपवर इतर प्रवाशांसोबत उतरला. यावेळी मात्र अक्षय रक्ताच्या थारोळ्यात बसमध्ये विव्हळत पडला होता.
दरम्यान बसमध्य़े एका प्रवाशावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच ऑस्टिन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी अक्षयला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अक्षयच्या मानेवरील जखमा खोल असल्यामुळे उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी बसमधील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा आरोपीची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी आरोपी दीपकचा शोध घेऊन त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपी दीपकने अक्षयवर चाकू हल्ला केल्याचे कबूल केले. अक्षय माझ्या काकांसारखा दिसतो, म्हणून मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनी आरोपी दीपकला ट्रैविस काउंटी तुरूंगामध्ये ठेवले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List