उलव्यात भररस्त्यात महिलेची गळा चिरून हत्या, मारेकरी फरार; पोलिसांची झोप उडाली
एका विवाहित महिलेची भरस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उलव्यातील सेक्टर नंबर 5 येथे घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने महिलेची हत्या करून पळ काढला असून या घटनेने परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेने उलवे पोलिसांची झोप उडाली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे पथक मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
गेल्या तीन वर्षांत राज्यातील महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा खून तसेच लैंगिक छळाचे गुन्हे होत असताना मात्र गृहविभाग झोपले असल्याचा आरोप केला जात आहे. उलवे येथे सेक्टर 5 येथे विजय लक्ष्मी टॉवरमध्ये अलवीना अदमली खान (27) ही महिला आपल्या पतीसोबत वास्तव्यास होती. अलविना आज सकाळी आपल्या घराच्या दिशने पायी जात होती. याचवेळी तिच्या मार्गावर असलेल्या अज्ञात मारेकऱ्याने तिला रेडियन्स स्प्लेंडर बिल्डिंगसमोर गाठून तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेली अलविना त्याच ठिकाणी कोसळल्यानंतर मारेकऱ्याने तेथून पळ काढला.
… अन् तिचा काही वेळातच मृत्यू
घडलेली घटना परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अलविना या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अलविनाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
ओळख पटू नये म्हणून तोंडावर रुमाल
अलविनाची हत्या करणारा आरोपी ओळख पटू नये यासाठी तोंडावर रुमाल बांधून आल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List