शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी स्वतंत्र गट तयार करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. आता दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण या प्रकरणी सप्टेंबर 2023 पासून सुनावणी झालेली नाही. दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी 7 मे रोजी कोर्टासमोर लागलेले आहे. त्यामुळे आता 7 मे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येते का? हे पाहणे महत्वाचे आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावरसुद्धा निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे शरद पवार गटाकडून आयोगाच्या निर्णयास आव्हान देण्यात आले होते. शरद पवार गटाच्या याचिकेवर अनेक दिवसांपासून सुनावणी नव्हती. आता राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या तारखेला हे प्रकरण कोर्टासमोर लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List