थोडीतरी लाज बाळगा..; अमिताभ बच्चन यांच्या त्या 13 ट्विट्समुळे भडकले नेटकरी
सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं सर्वांत प्रभावी माध्यम मानलं जातं. एखादी घटना घडली की सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत असंख्य जण त्यावर मोकळेपणे व्यक्त होतात, कधी प्रश्न उपस्थित करतात तर कधी जाब विचारतात. परंतु याच सोशल मीडियावर एखाद्या अत्यंत मोठ्या विषयावरून कोणी फक्त मौन बाळगत असेल तर त्यावरून चाहत्यांनी चिडणं स्वाभाविकच आहे. सध्या अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत असंच काहीसं घडतंय. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारे बिग बी हे सध्या देशभरात सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींबाबत केवळ ब्लँक पोस्ट लिहित आहेत. यामुळे चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर बिग बी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फक्त ब्लँक पोस्ट लिहित आहेत.
22 एप्रिल रोजी त्यांचं शेवटचं असं ट्विट होतं, ज्यामध्ये मजकूर लिहिलेला होता. त्यानंतर ते दररोज फक्त पोस्टमध्ये ट्विटचा आकडा लिहित आहेत. त्यापुढे ते काहीच म्हणत नाहीयेत. गेल्या तेरा दिवसांपासून बिग बी असेच ट्विट रोज करत आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय बोलायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पहलगाम हल्ल्याच्या 14 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हवाई हल्ले सुरू आहेत. देशभरात तणावाचं वातावरण असताना, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना बिग बी मात्र एक्स अकाऊंटवर फक्त ब्लँक पोस्ट लिहित आहेत.
त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे कसे महानायक.. महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतच नाहीत’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे मूक ड्रील कधीपर्यंत सुरू राहणार’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्याने केला. ‘आता तरी काही बोला’, अशीही विनंती अनेकांनी बिग बींना केली आहे. ‘पहलगाम हल्ल्यावर संपूर्ण देश व्यक्त होत असताना, हळहळ व्यक्त करताना तुम्ही किमान दोन शब्द लिहू शकत नाही का’, असा संतप्त प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. आता बिग बींची ही मूक मालिका कधीपर्यंत सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List