‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
देशात एखादी मोठी घटना घडली की त्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चित्रपट बनवला जातो. पण त्याआधी त्या घटनेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये शर्यत लागते. सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत असंच काहीसं घडतंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. आता याच नावावरून चित्रपट काढण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना याबद्दलची माहिती दिली.
आतापर्यंत जवळपास 15 चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या टायटलची नोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. ही नोंदणी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनद्वारे (IMPPA) केली जात आहे. जेव्हा जेव्हा एखादा मोठा राष्ट्रीय मुद्दा किंवा घटना घडते तेव्हा चित्रपट निर्माते लगेचच त्याच्याशी संबंधित शीर्षक नोंदवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर चित्रपट बनवला जात असो किंवा नसो, परंतु त्याचं शीर्षक मिळवणं महत्त्वाचं असतं. ‘उरी’, ‘वॉर’, ‘फायटर’सारख्या चित्रपटांच्या यशानंतर युद्ध किंवा देशभक्तीवर आधारित कथा प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय असल्याचं दिसून आलं.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज केल्याची कबुली दिली. याविषयी ते म्हणाले, “त्यावर चित्रपट बनेल की नाही हे आताच सांगणं कठीण आहे. परंतु जेव्हा देशाशी संबंधित एखादा मोठा मुद्दा येतो तेव्हा निर्माता म्हणून आपलं पहिलं पाऊल म्हणजे शीर्षक नोंदणी करणं. चित्रपटाचं नियोजन शीर्षकाशिवाय सुरूच करता येत नाही.” या विषयाशी ते भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
“मला माहीत आहे की या देशाने कोणत्या परिस्थितीचा सामना केला आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून आपण पाकिस्तानकडून जे सहन केलं ते कोणापासूनही लपलेलं नाही. मी स्वत: ते दु:ख भोगलंय. कारण माझ्या समुदायाला या दहशतवादाचा थेट त्रास सहन करावा लागला आहे”, अशा शब्दांत अशोक पंडित व्यक्त झाले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचाच बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. याअंतर्गत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूडमध्ये खऱ्या युद्धाच्या घटनांशी संबंधित अनेक चित्रपट आधीच बनवले गेले आहेत. त्यात उरी, बॉर्डर, कारगिलसारखे चित्रपट समाविष्ट आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List