“तुला मरायला 2 तास बाकी अन् तू..”; पाकिस्तानी अभिनेत्रीची जावेद अख्तरांवर आगपाखड
पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. बुशराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अख्तरांना याप्रकरणी मौन बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “तुम्ही मरायला दोन तास शिल्लक राहिले आहेत”, असंही ती या व्हिडीओत म्हणाली आहे.
जावेद अख्तर यांचं थेट नाव न घेता बुशरा म्हणाली, “आमचे तथाकथित लेखक, त्यांना तर संधीच हवी होती. खरंतर त्यांना बॉम्बेमध्ये घरसुद्धा भाड्याने मिळत नव्हतं. स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते वाटेल ते बोलू शकतात. तुम्ही काय काय बोलताय काय माहीत? थोडीतरी लाज बाळगा. मरायला तुमच्याकडे फक्त दोन तास शिल्लक राहिले आहेत आणि तुम्ही फालतुच्या गप्पा मारताय.”
जावेद अख्तर यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासारखं गप्प राहिलं पाहिजे, असं बुशराने पुढे म्हटलंय. “एखाद्याने इतकं कशाला घाबरावं, इतका स्वार्थ का? चला आता तुम्ही गप्प बसा. नसीरुद्दीन शाहसुद्धा आहेत, ते तर गप्प बसले आहेत ना? इतर काहीजण सुद्धा गप्प बसलेत ना? ज्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी मनातच ठेवावं. हे तर विनाकारण बडबड करत आहेत. मी काही भारतीय मुलींना भेटले आणि त्यांनी माझ्याशी खूप चांगला संवाद साधला. भारतातील लोक वाईट नाहीत, पण काहींना चिथावलं जातंय”, अशी टीका तिने केली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याची विनंती केली होती. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. “हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी तात्काळ पावलं उचलावीत. सीमेवर काही फटाके फोडल्याने काहीच होणार नाही. आता कठोर पावलं उचला. असं काहीतरी करा जेणेकरून तिथला मंद लष्कर प्रमुख अशा पद्धतीची वक्तव्ये करणार नाही. हिंदू आणि मुस्लीम हे दोन वेगवेगळे समुदाय आहे, असं तो म्हणाला. त्याच्या देशातील हिंदूंची त्याला जराही काळजी नाही. त्यांना जराही आदर नाही का? त्यांना लक्षात राहील असं परखड उत्तर देणं गरजेचं आहे. मला राजकारणाबद्दल फार काही कळत नाही. पण ही आर या पारची वेळ आहे”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List