दादा कोंडकेंचा सिनेमापाहून ओशोंनी घेतली भेट, भेटीदरम्यान घडली चमत्कारीक गोष्ट
दादा कोंडके यांचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नव्हतं. त्यांच्या चित्रपटांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले. आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. त्यापैकी एक गाजलेला किस्सा म्हणजे त्यांची ओशो रजनीश यांच्याशी झालेली भेट, जी ‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटातील एका वादग्रस्त प्रसंगामुळे घडली.
‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटात दादांनी चमत्कार करणाऱ्या बुवाबाजीवर विनोद केला होता. त्यांनी एक पात्र साकारलं, जो हातातून, काखेतून गणपती, आंगठ्या, सुपारी अशा वस्तू काढून दाखवत असे. हे पात्र सत्य साईबाबांवर आधारित होतं. ही कल्पना दादांना उषा मंगेशकर यांनी सांगितलेल्या एका किस्स्यावरून सुचली. उषा ताईंनी दादांना सांगितलं होतं की, सत्य साईबाबांनी लता दिदींना चमत्काराने गणपती काढून दिला. दादांनी विचारलं, “मग तुम्हाला काय दिलं?” त्या गळ्यातली चेन दाखवत म्हणाल्या, “ही चेन.” मग दादांनी विचारलं, “तुमच्या सेक्रेटरीला काय दिलं?” त्या म्हणाल्या, “सुपारी.” दादांनी मनात म्हटलं, “काय माणूस! मोठ्या माणसाला मोठी वस्तू, छोट्या माणसाला छोटी!” हा किस्सा ऐकूनच दादांनी चित्रपटात असं बुवाचं पात्र रचलं.
चित्रपटातील सीन
या सीनचं चित्रीकरण करताना दादांनी काही हिप्पींना आश्रमातील भक्त म्हणून आणलं होतं. सीन असा होता की, दादा आणि जयश्री आश्रमात येतात आणि तिथे लोळणाऱ्या हिप्पींच्या पायात पाय अडकून दादा पडतात. एका शॉटदरम्यान दादांचा पाय खरंच एका चरस प्यायलेल्या हिप्पी बाईच्या पायात अडकला आणि ते धाडकन तिच्या शेजारी पडले. दादा उठण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाईने त्यांना घट्ट मिठी मारली. कॅमेरा चालू होता, पण ती त्यांना सोडायलाच तयार नव्हती. ती दादांच्या गालांचे मुके घेत होती. अखेर दादांनी कसंबसं स्वतःला सोडवून घेतलं आणि सीन पूर्ण झाला.
वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…
ओशोंच्या आश्रमातून आला होता फोन
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कुणीतरी ओशो रजनीश यांना सांगितलं की, दादा कोंडके यांनी त्यांच्यावर विनोद केला आहे. काही दिवसांनी ओशोंचे सेक्रेटरी अमरीश भट यांचा दादांना फोन आला. ते शुद्ध मराठीत म्हणाले, “आचार्य रजनीशजींनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे.” सुरुवातीला दादांनी या फोनकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण भट यांचे १०-१२ फोन आल्यावर दादांनी ओशोंना भेटायचं ठरवलं. दादांचे मित्र मांढरे यांनी सावध केलं, “दादा, त्या आश्रमातल्या बायका तुझ्या गळ्यात पडतील. जरा जपून जा आणि त्यांना ‘माँ’ म्हणायचं.”
दादांनी भट यांना फोन करून विचारलं, “मी येईन, पण तुमच्या त्या ‘माँ’ वगैरेंचं काय?” भट म्हणाले, “तुम्ही या, आमची माणसं दारात असतील, तुम्हाला आत घेऊन येतील.” दादा मांढरेला घेऊन ओशोंच्या आश्रमात गेले. तिथे त्यांचा मोठ्या आदराने सत्कार झाला. मांढरेला बाहेर ठेवून भट यांनी दादांना ओशोंच्या दालनात नेलं. दादांनी ऐकलं होतं की ओशोंकडे सोन्याचं सिंहासन आहे आणि प्रत्यक्षात ते खरंच होतं. तिथे अनेक देखण्या स्त्रिया, तरुणांपासून मध्यमवयीनांपर्यंत, बसल्या होत्या. खोलीत सेंट आणि धुपाचा सुगंध दरवळत होता. दादांना कसं बोलायचं, काय उत्तर द्यायचं हे मनात ठरवूनही तिथलं वातावरण पाहून ते थक्क झाले.
ओशो आले आणि म्हणाले, “बसा. ऐकलंय तुम्ही मराठी चित्रपटात खूप चांगलं काम करता. पण तुम्ही माझ्याबद्दल चित्रपटात जे दाखवलंय, तसं खरं नाही. मी लोकांना ज्ञान शिकवतो, बाकी काही नाही. तुम्ही माझ्या सेक्रेटरीला म्हणालात की आश्रमातल्या मुली गळ्यात पडतील, पण त्या फक्त उत्साहात असतात, एवढंच.” दादांनी स्पष्ट केलं, “कुणीतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं. मी तुमच्यावर विनोद केला नाही, तो सत्य साईबाबांवर होता.”
यावर ओशो फक्त हलकेच हसले आणि त्यांनी दादांचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात इतकी जादू होती की, दोन मिनिटं दादा जणू वेगळ्याच जगात गेले. “मी कोण आहे, कुठे आहे,” याचा त्यांना विसर पडला. ओशोंचा हात लोण्यासारखा मऊ होता. दादांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की, ती दोन मिनिटं त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List