नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीबद्दल समजताच अशी होती विवियन रिचर्ड्स यांची प्रतिक्रिया; बाळाबद्दल म्हणाले..
अभिनेत्री नीना गुप्ता यांना 1989 मध्ये जेव्हा समजलं की त्या गरोदर आहेत, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. परंतु त्यांना या गोष्टीचीही जाणीव होती की यापुढील त्यांचा प्रवास काही सोपा नसणार. कारण नीना यांनी ‘सिंगल मदर’ म्हणजेच एकल मातृत्वाची निवड केली होती. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीना यांचं ते बाळ होतं. या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं नाही. ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी मुलीला एकटीनेच जन्म देण्याच्या निर्णयाविषयी मोकळेपणे लिहिलंय. बाळाला जन्म देण्याआधी त्यांनी विवियन यांनाही विचारलं होतं. जेव्हा विवियन यांनी त्यांना साथ दिली, तेव्हाच बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर नीना ठाम राहिल्या होत्या.
या आत्मचरित्रात नीना यांनी सांगितलं की एका क्रिकेट मॅचनंतर आयोजित केलेल्या डिनर पार्टीत त्यांची विवियन यांच्याशी पहिली भेट झाली होती. नंतर दिल्ली एअरपोर्टवर पुन्हा भे झाल्यानंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेट करू लागले. विवियन पुन्हा त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर नीना यांना गरोदर असल्याचं समजलं. “आमच्या अफेअरमधून मी गरोदर झाले. जेव्हा मला गरोदर असल्याचं समजलं, तेव्हा तो त्याच्या मायदेशी निघून गेला होता. काहींनी मला गर्भपाताचा सल्ला दिला, तर काहींनी मला सिंगल मदर असल्याचे तोटे काय हे समजावण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येकाचं संयमाने ऐकून घेतलं. त्यांना माझी काळजी वाटत होते, हे मला माहीत होतं. पण जेव्हा मी घरी परतले आणि स्वत:ला विचारलं की, मला काय वाटतं? तेव्हा त्याचं उत्तर होतं की मी खूप खुश आहे”, असं त्यांनी म्हटलंय.
एकांतात शांत डोक्याने विचार केल्यावर त्यांना याची जाणीव झाली की प्रेग्नंसीबद्दल त्या खूप खुश आहेत. त्यानंतर त्यांनी विवियन यांना बाळाबद्दल विचारलं. “त्या परिस्थितीत फक्त मी एकटीने निर्णय घेणं योग्य नव्हतं. बाळाच्या वडिलांचा, विवियन यांचा समान हक्क होता. त्यामुळे एकेदिवशी मी त्यांना फोन करून सर्वकाही सांगितलं. जर मी या बाळाला जन्म दिला, तर तुला काही समस्या आहे का, असं मी त्यांना विचारलं. माझ्या प्रेग्नंसीबद्दल विवियनसुद्धा खूप खुश होता आणि त्याने मला बाळाला जन्म देण्यास सांगितलं. हे ऐकल्यानंतर मी योग्य मार्गावर असल्याची मला खात्री झाली. त्या बाळाला जन्म देण्याची माझी खूप इच्छा होतीच, पण त्याचसोबत वडिलांच्या होकाराशिवाय मी पुढे पाऊल टाकलं नसतं. त्यामुळे विवियनने साथ दिल्यावर मला दिलासा मिळाला”, असं त्यांनी लिहिलंय.
विवियन रिचर्ड्स हे विवाहित होते आणि ते दुसऱ्या देशात राहत होते. मसाबा गुप्ताला जन्म दिल्यानंतरही नीना आणि विवियन यांचं अफेअर काही वर्षे सुरू होतं. नंतर नीना यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List