‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला असा दावा तेथील काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘पहलगामवरील हल्ला हा या देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत, देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
शरद पवार आधी धर्माचा संबंध नसल्याचे बोलले होते. मात्र फडणवीस साहेबांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. वडेट्टीवार जे बोलत आहेत ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचं काम आहे, वडेट्टीवारांनी हल्ल्यातील चित्रीकरण पहावं, या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले आहे. अतिरेक्यांना भीती वाटण्यासारखे तेथे कोणतेही वातावरण नव्हते. गोरगरीब माणसं होती, लहान मुलं होती, महिला होत्या त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निष्पाप लोकांची निघृण पणे केलेली ही हत्या आहे. निश्चितपणे भारत याचं प्रत्युत्तर देईल. देशातील 140 कोटी जनता मोदींच्या पाठीमागे आहे. पाकिस्तानला याबाबतीत निश्चित धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. आज डिप्लोमॅटिक पद्धतीने पहिले पाऊल टाकलेले आहे. यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेतो ते पाहावं लागेल. त्यावर भारताचे पुढचे पाऊल ठरवले जाईल. युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे . नरेंद्र मोदी सारखं कणखर नेतृत्व आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List