‘फक्त 700 प्रेक्षक?’ मी गाणं गाणार नाही; मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करची नौटंकी, रॅपरने केला मोठा खुलासा
नेहा कक्कर अलीकडेच तिच्या ऑस्ट्रेलियातील कॉन्सर्टमुळे चर्चेत होती. याठिकाणचा एक व्हिडीओ फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा कक्कर रडताना दिसत होती. ही गायिका कार्यक्रमाला 3 तास उशिरा पोहोचली, त्यानंतर तिला ट्रोल केले जाऊ लागले आणि प्रत्युत्तरात नेहाने सर्व गोष्टींसाठी आयोजकांना जबाबदार धरले. आता या प्रकरणात अनेक गंभीर आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता शोच्या रॅपरने कॉन्सर्टबद्दलचे सर्व सत्य उघड केले आहे.
मार्च महिन्यात गायिका नेहा कक्कर तिच्या एका कॉन्सर्टमुळे चर्चेत होती. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये, नेहा मेलबर्नमधील एका संगीत कार्यक्रमादरम्यान स्टेजवर रडताना आणि प्रेक्षकांची माफी मागताना दिसत आहे. या शोमध्ये नेहाला संध्याकाळी 7.30 वाजता परफॉर्म करायचे होते असे सांगण्यात आले होते, पण ती रात्री 10 नंतर स्टेजवर पोहोचली, त्यामुळे प्रेक्षक खूप संतापले.
स्टेजवर पोहोचताच नेहाने आयोजकांवर निशाणा साधला आणि म्हणाली की तिला मूलभूत सुविधाही पुरविल्या नाहीत. यामुळे तिच्या टीमला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यानंतर, आयोजकांनी नेहाच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आणि खरं काय आहे ते लोकांसमोर आणले. रॅपर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पेस डी यांनी सिद्धार्थ कन्नन यांना एका मुलाखतीत सांगितले की, “मेलबर्न शोचे आयोजक बीट प्रॉडक्शनने नेहाला आमंत्रित केले होते. मी स्वतः आयोजक प्रीत पाबला यांच्याशी बोललो, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नेहा परफॉर्म करण्यास नकार देत राहिली आणि ‘मी आता जाणार नाही’, ‘मी हे करणार नाही’ असे म्हणत राहिली.”
शोशी संबंधित असलेले बिक्रम सिंग रंधावा यांनी पेस डीच्या म्हणण्याला होकार दिलेला आहे. ते म्हणाले, “प्रेक्षक सतत नेहाचे नाव घेऊन स्वागत करत होते, पण ती नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा आली. ऑस्ट्रेलियातील लोक वेळेचा खूप आदर करतात. अनेक लोकांनी ३०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 15-16 हजार रुपये) पर्यंतची तिकिटे खरेदी केली होती.”
सर्वात मोठा आरोप असा होता की नेहाने कमी गर्दीमुळे सादरीकरण करण्यास नकार दिला होता. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, नेहा म्हणाली होती, “फक्त 700 लोक? जागा भरल्याशिवाय मी सादरीकरण करणार नाही.” नेहाने शोमध्ये होणारा विलंब, थकित पेमेंट, जेवणाचा अभाव आणि टीमसाठी हॉटेल सुविधांबद्दल बोलले होते. पण पेस डी यांनी या आरोपांचे खंडन केले आणि म्हणाले, “तांत्रिक सेटअप, ध्वनी आणि माइक सर्व काही तयार होते. इतर कलाकारांनी वेळेवर सादरीकरण केले. नेहाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List