पहलगामचा हल्ला हा देशावर हल्ला, यात धर्म, भाषा, जात, प्रांत महत्त्वाच्या नाहीत – शरद पवार
पहलगाममधील हल्ला हा या देशावरचा हल्ला आहे. यामुळे यात धर्म, जातपात न पाहता देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल. देश एक आहे हा संदेश दुश्मनांना पाठवण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन उपयोगी ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ठाण्यात एका कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. पहलगाम हल्ल्यावर शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत ठाण्यात पाचपाखाडी येथे तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला आनंद आहे या सगळ्याला उपस्थित राहता आलं. काही लोक म्हणतात की, मी अशा कार्यक्रमांना जात नाही, ते अर्धसत्य आहे. पण मी राज्याचा प्रमुख असताना चार ते पाच वेळेला पंढरपूरला पांडुरंगाची पूजा महाराष्ट्राच्या भल्यासाठी केली होती. तुळजापूरला तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे, तिथे महापूजा अनेकदा केली आहे. त्यामुळे आपलं संदर्भाचं प्रदर्शन करू नये. पण जे काही आपल्या अंतकरणामध्ये असेल त्याचं प्रदर्शन न करता ते अर्पित करण्याची भूमिका घ्यावी, या भावनेनं आणि श्रद्धेनं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, असे शरद पवार म्हणाले.
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात
“पहलगाम हल्ला हा या देशावरचा हल्ला”
पहलगामवरील हल्ला हा या देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज महाराष्ट्रीयांवर कुठल्या शक्तिचा हल्ला होत असेल तर, देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल. मी जाहीरपणे सांगितलं की, पंतप्रधान जे काही उपाययोजना करतील त्याला आमचं सहकार्य आहे. सर्वपक्षीय बैठकीत पक्षाच्या प्रतिनिधींनी हीच भूमिका मांडली आणि तीच भूमिका पुढेही राहील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आमच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रश्नावर संपूर्ण देश आणि सर्व पक्ष एक आहे. हा संदेश दुश्मनांना पाठवण्यासाठी स्पेशल अधिवेशन उपयुक्त ठरेल, असे शरद पवार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List