पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात
पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, सरकराच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार झाला असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी म्हणाल्या की, पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहियेत, तुम्ही तयार आहात का? जनरल सॅम माणेकशॉ म्हणाले की आम्हाला 8 दिवस द्या. आठ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला. याला म्हणतात नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती. सैनिकांवर सोडलं ते ठीक आहे. कश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवर आणि गृहखात्यावर होती. सगळ्यात आधी जर कारवाई करायची असेल तर ती पंतप्रधानांनी गृह खात्यावर करावी. आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, पण सरकारच्या चुकांच्या पाठीशी नाही. सरकार यात वारंवार चुका करतंय आणि राजकारण करतंय. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. अमित शहांच्या जागी आमच्यापैकी कुणी असतं तर त्यांनी राजीनामा मागितलाच असता. सरकार चुकीचं काम करत असेल तर विरोधी पक्षाचं काम आहे बोट ठेवणं, यात चुकीचं काय आहे? असे संजय राऊत म्हणाले.
तसेच सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही हे मी म्हणालो होतो. कश्मीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी आम्ही केली होती. राहुल गांधी यांनी ही तीच मागणी केली होती. पण सरकार कश्मीर प्रश्नी कुणालाही बोलू देत नाही आणि बोलू देणार नाही. आणि सर्वपक्षीय बैठकीत ते बोलतील त्याला टाळ्या वाजवायच्या. आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवा, किमान दोन दिवस कश्मीरवर चर्चा करा, या हल्ल्याची जबाबदारी घेऊन गृह खात्यावर कारवाई करा. 26 जणांचा मृत्यू झाला आहे, सरकारने घेतलेला हा नरबळी आहे. सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार झालेला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे होता. पुलवामामध्ये ज्या पद्धतीने 40 जवान मारले गेले. त्यात ते कसे मारले गेले यात राजकारण येतं. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सांगत आहेत की वारंवार सांगितलं आम्ही की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, म्हणजे सरकारला त्यांना मारायला जाऊ द्यायचं होतं राजकारणासाठी. हे जर कुणी म्हणालं की त्याला देशद्रोही ठरवलं जाईल, पाकिस्तानात जा म्हणून सांगितलं जाईल. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? सर्जिकल स्ट्राईक आम्ही गल्लीतही करतो. मुंबईत आम्ही 1950 पासून विरोधकांवर स्ट्राईक करतोय. हल्ला जो इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्रींनी केला असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता, त्यांची जबाबदारी होती की विरोधी पक्ष काय बोलतो. पण पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केला नाही ते निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले. राहुल गांधींनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला. राहुल गांधी अमेरिकेतून परतले आणि कश्मीरला गेले असे संजय राऊत म्हणाले.
तसेच हिंदुस्थानचे सैन्य मोठे सैन्य आहे. सरकारने फ्रान्सकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात राफेल विकत घेतले आहेत. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पंतप्रधानांनी सैन्याला फ्री हॅण्ड दिले आहे आणि दिलेच पाहिजे. सैन्य आहे म्हणूनच कश्मीर हिंदुस्थानात आहे. कश्मीरमध्ये सैन्याला फ्री हॅण्ड होतंच ना तरी हल्ला झालाच ना. पण यात राजकीय नेतृत्वाची काय भूमिका आहे? सैन्यावर ही गोष्ट सोडून तुम्ही हात नाही झटकू शकत. यासाठी देशाचे गृहमंत्रायल जबाबदार आहे. जर बदला घ्यायचा आहे आणि खरी श्रद्धांजली वहायची असेल तर गृहमंत्रायलायवर कारवाई करा. प्रश्न विचारा की इंटेलिजन्स का फेल गेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
पुलवामा घडून सात वर्ष झाली, सरकारने काय कारवाई केली? 40 जवान गेले सरकारने काय केलं? एक चित्रपट काढला, How the josh, तुम्ही सांगा कुठे आहे जोश? कश्मीर फाईल्स चित्रपट काढला आणि पंतप्रधान अश्रू पुसत बाहेर आले. आता गृहमंत्रालय फाईल्स बाहेर आल्या पाहिजेत. पाकिस्तानच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे ही नौटंकी आहे, याला बदला नाही म्हणत. हिंदुस्थानचा एक चॅनेल 4 पीएम तुम्ही बंद केला. या चॅनेलच्या लोकांनी मोदी आणि शहांना प्रश्न विचारले, तर तुम्ही हा चॅनेल बंद केला. पाकिस्तानशी बदला घ्यायचा आहे तुम्ही चॅनेलशशी बदला घेतला. या 4PM चॅनेलवर बंदी घातली हे चॅनेलच तुमचे 12 वाजवणार असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List