पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो – मल्लिकार्जुन खर्गे
पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत की, “हिंदुस्थान जे म्हणतो, त्याची अंमलबजावणी करतो. पण पाकिस्तान आपल्या शब्दांवर टिकत नाही आणि वारंवार आपली वचने मोडतो. पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो. यामुळे दोन्ही देशांचे नुकसान होते आहे. त्यामुळे आता एकच मार्ग उरतो, जर ते लढले, तर आपल्यालाही लढावे लागेल आणि जर ते शांत राहिले, तर आपणही शांतता राखू.”
खर्गे म्हणाले, “आज बुद्ध पौर्णिमा आहे. आपण हेच इच्छितो की, सर्वत्र शांतता नांदावी. सर्वजण शांततेने एकत्र नांदावेत. पण देश वाचवण्यासाठी जर गरज भासली, तर आपल्याला लढावेच लागेल. कारण देश वाचला, तरच आपण सारे राहू शकतो.”
ते म्हणाले, “आपली सेना पूर्ण ताकदीने लढते आहे. आपल्या शूर जवानांचे आपण आभार मानतो, त्यांना नमन करतो. त्यांच्या शौर्याला सलाम करतो. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. देशासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल आणि देशाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे लागेल.”
मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, “आम्ही मागणी करतो की संसदचे विशेष अधिवेशन बोलावले जावे. या अधिवेशनात आपण सर्वांनी चर्चा करावी की हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान सध्या काय स्थिती आहे आणि सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करत आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List