नेपाळमध्ये पुन्हा एकदा GenZ निदर्शने सुरू, पोलिसांनी विद्याथ्यांवर केला लाठीमार; अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू
नेपाळमध्ये पुन्हा एकदा तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (CPN-UML) पक्षाच्या युवा जागरण मोहिमेला विरोध करत हे तरुण रस्त्यावर उतरले. यात यूएमएलच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती चिघळताच सिमरा आणि आसपासच्या भागात कर्फ्यू जाहीर करण्यात आला. या संघर्षात अनेक तरुण जखमी झाले असून, सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. हे निदर्शन पूर्वीच्या Gen Z आंदोलनांचा भाग म्हणून पाहिले जात आहे, ज्यात तरुण पिढीने राजकीय बदलाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी मधेश प्रांतातील बारा जिल्ह्यात घडली. जिथे यूएमएलने ‘युवा जागरण मोहीम’ आयोजित केली होती. या मोहिमेच्या प्रमुख नेते म्हणजे पक्षाचे वरिष्ठ नेते शंकर पोखरेल आणि महेश बसनेट. हे दोन्ही नेते बुधवारी सिमरा येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काठमांडूतून येणार होते. मात्र Gen Z तरुणांनी यापूर्वीच सोशल मीडियावर या मोहिमेचा तीव्र निषेध नोंदवला होता आणि या विरोधात अंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.
मंगळवारी रात्री Gen Z गटाने सोशल मीडियावर पोस्ट करून यूएमएल नेत्यांच्या आगमनाला विरोध करण्याचे आवाहन केले. यानंतर पोलीस प्रशासनाने सिमरा आणि विमानतळ परिसरात सुरक्षा वाढवली. तरीही बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता सिमरा चौकात १०० ते १५० Gen Z तरुण एकत्रित आले. ते शांततेने निदर्शन करत होते, पण यूएमएलच्या कार्यकर्ते विमानतळाकडे जात असताना दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाला हिंसक वळण लागले, ज्यात यूएमएलच्या कार्यकर्त्यांनी Gen Z तरुणांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यात अनेक तरुण जखमी झाले आणि त्यांना सिमरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच काही Gen Z तरुण विमानतळापर्यंत पोहोचले आणि तेथील गेटवर तोफफोड केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. दरम्यान, या घटनेनंतर सावधगिरी म्हणून काही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List