रायगडात चार हजार दुबार मतदार; 10 नगर परिषद क्षेत्रातील जाहीर झालेल्या यादीतून पोलखोल
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच रायगड जिल्ह्यामध्ये ४ हजार १५६ मतदार दुबार असल्याची बाब उघडकीस आली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या दहा नगर परिषदांच्या मतदार यादीमध्ये ही नावे आढळून आली आहेत. या दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टारची खूण केली आहे. हे मतदार दोन वेळा मतदान करणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचे आश्वासन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना कसे रोखणार याबाबत विविध राजकीय पक्षांनी साशंकता व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत व माथेरान नगर परिषदांच्या निवडणुका २ डिसेंबरला होणार आहेत. नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजताच रायगड जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र त्यापूर्वी सर्व पक्षांनी मतदार याद्यांबाबत आक्षेप घेतला असून आयोगाकडे लेखी तक्रारीदेखील केल्या. निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायतींना संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी याद्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात, एकच प्रभाग आणि एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले आहेत. मतदार यादी संबंधित भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. दुबार नावे असलेल्या कोणत्याही एका मतदार संघातच मतदान करता येणार असून तसा अर्जदेखील त्यांच्याकडून लिहून घेण्यात येणार आहे.
नवी मुंबईत आज बोगस मतदारांचे प्रदर्शन
सुलभ शौचालय, पालिका आयुक्तांचे निवासस्थान, पामबीच रोडवर बोगस मतदारांच्या नोंदणीचा पर्दाफाश झाल्यानंतर मतदार यादीतील अन्य घोटाळे उघड करण्यासाठी मनसेने उद्या बोगस मतदारांचे प्रदर्शन भरवले आहे. वाशी येथील दैवज्ञ भवन हॉलमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. या प्रदर्शनात नागरिकांना मतदार याद्यांमधील अनेक धक्कादायक खुलासेही पहायला मिळणार आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
हे आहेत पर्याय
दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड.
एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल तर एका केंद्राची निवड.
वरील दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का मारला जाणार आहे.
मतदार मतदानासाठी आला तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
नगर परिषद निहाय दुबार मतदार
खोपोली ८९१, अलिबाग २४४, श्रीवर्धन १३१, मुरुड-जंजिरा ६९, रोहा ६२, महाड ३५९, पेण ७८४, उरण ७८१, कर्जत ८१७, माथेरान १८.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List