डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण हा मानाचा पुरस्कार यंदा नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर झाला असून, मराठवाड्याच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अथक आणि अमूल्य कार्याचा हा सन्मान आहे. डॉ. देव यांनी मराठवाड्यातील दुर्गम भागात वर्षानुवर्षे भटकंती करून प्राचीन मंदिरांची वास्तुरचना, शिल्पकला, कोरीवकाम आणि सांस्कृतिक इतिहास याचा सखोल अभ्यास केला आहे. देवाचे अस्तित्व निर्जीव दगडात शोधायचे नसते तर, मानवाच्या कलात्मक स्पर्शातून साकारलेल्या शिल्पातील सौंदर्य हाच देवत्वाचा खरा अर्थ आहे.
त्यांच्या संशोधनातुन साठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘Temple in Marathwada’ हा प्रबंध नवोदित ईतिहास संशोधक अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. देशातील प्रतिष्ठित INTACH – Indian National Trust for Art and Cultural Heritage या संस्थेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचा सविस्तर अभ्यास करून तयार करण्यात आलेला महत्त्वपूर्ण ‘Nanded Heritage’ हा ग्रंथ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता.
डॉ. देव यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सादर झालेला ‘प्राचीन महाराष्ट्र : परंपरा आणि समृद्धी’ हा संदर्भग्रंथ तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून प्रकाशित मराठवाडा मुक्ती संग्रामातील मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित ग्रंथ हे त्यांचे अभ्यासपूर्ण योगदान विशेष दखल घेण्यासारखे आहे. इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व या विषयांवर त्यांच्या असंख्य लेखनाचे विविध दैनिकांमध्ये सातत्याने प्रकाशन होत आले आहे.
समाजहिताचा निःस्वार्थ भाव, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि वारशाचे संवर्धन यासाठीचे अविरत योगदान यांचा योग्य गौरव म्हणून हा मानाचा “मराठवाडा भूषण” पुरस्कार त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List