विरारमध्ये पाण्यावरून वाद पेटला, महिलेने केली शेजाऱ्याची हत्या
पावसाळा संपून काही काळ उलटत नाही तोच वसई, विरारमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. पाणी भरण्यावरून रहिवाशांमध्ये रोज भांडणे होत आहेत. विरारच्या जे.पी. नगर परिसरात तर हा वाद एवढा पेटला की, संतापाच्या भरात महिलेने डासांचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. उमेश पवार (53) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी कुंदा तुपेकर (47) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पाण्यावरून हत्या झाल्याने वसई, विरारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विरारमधील जेपीनगर भागात अनेक गृहसंकुले असून तेथे पालिकेच्या सार्वजनिक नळावरून नागरिकांना पाणी भरावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने अनेकदा नळावर गर्दी होते, रांगा लागतात. त्यातून वादही होतात. 15 क्रमांकाच्या इमारतीमध्ये शेजारी राहणारे उमेश पवार व कुंदा तुपेकर यांच्या कुटुंबात नेहमी खटके उडायचे. मंगळवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण एवढे वाढत गेले की कुंदा तुपेकर हिने घरातून डास मारण्याचा स्प्रे आणला आणि तो थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जेपीनगरमधील रहिवासीही हादरले. विषारी स्प्रे तोंडावर मारल्याने शेजारी राहणारे उमेश पवार बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांच्या कुटुंबाने रहिवाशांच्या मदतीने त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन कुंदा तुपेकर यांना अटक केली. अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येचा अधिक तपास सुरू आहे. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणाने शेजाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
वाढती लोकसख्या व अपुरा पाणीपुरवठा
वसई, विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे किंवा फार कमी वेळेसाठी पाणी येत असल्यामुळे सार्वजनिक नळावर तसेच सोसायटीच्या टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांमध्ये अक्षरशः झटापट सुरू असते. सार्वजनिक नळावर तर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी जमते. रांगेतील जागा, पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरून दररोज नळावर वादावादी होते. याच वादातून नाहक विरारमध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List