महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का? शरीरात काय बदल दिसतात?
अनेकांना पोळी-भाजीसोबत भात देखील रोज हवाच असतो. भाताशिवाय त्यांचे जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. साधे घरगुती जेवण असो किंवा भव्य मेजवानी असो, भात जवळजवळ प्रत्येक जेवणात एक महत्त्वाचा घटक असतो. काही लोक भाताशिवाय जेवणाची कल्पनाही करू शकत नाहीत.भाताचे तसे अनेक प्रकार आहेत जसं की डाळ-भात, कधी खिचडी, कधी पुलाव लोकांना खायला आवडतो. तर अनेकजण डाएट म्हणून भात खाणे टाळतात. पण जर विचार केला अन् खरंच एक महिना भात खाणे सोडून दिले तर शरीरात काय बदल होऊ शकतात? चला जाणून घेऊयात.
सुरुवातीचे काही दिवस थोडे कठीण असू शकतात.
जर तुम्हाला रोज भाक खाण्याची सवय असेल आणि तुम्ही अचानक भात खाणे बंद करता तेव्हा तुमच्या शरीराला त्याच्याशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला जास्त भूक, अशक्तपणा किंवा थोडीशी चिडचिड वाटू शकते. कारण भात तात्काळ ऊर्जा प्रदान करतो आणि जेव्हा ती कमी होते तेव्हा तुमचे शरीर थोडे सुस्त होते. परंतु जसे तुम्ही तुमच्या आहारात इतर धान्ये, जसे की बाजरी, बार्ली, क्विनोआ, गोड बटाटे किंवा मसूर यांचा समावेश करता, तसे तुमचे शरीर हळूहळू जुळवून घेते.
महिनाभर भात सोडल्याने वजन कमी होते का?
भातामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि ते सहज पचतात. जेव्हा तुम्ही भात खाणे टाळता तेव्हा तुमचे शरीर कमी कॅलरीज वापरते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. वजन कमी करू इच्छिणारे बरेच लोक भाताचे सेवन कमी करतात किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खातात. त्याऐवजी दलिया, ओट्स किंवा बाजरीसारखे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे राहण्यास आणि भूक कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेवर काय परिणाम होईल?
पांढरा तांदूळ सहज पचतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जलद वाढते. महिनाभर भात टाळल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. भात टाळल्याने गोड पदार्थांची इच्छा थोडी कमी होऊ शकते.
पांढऱ्या भाताला ब्राऊन राईस हा पर्याय
काहींना रोजच भात खाण्याची इच्छा होत असेल आणि ती रोखणे शक्य नसेल तर तुम्ही पर्यायी ब्राऊन राईस खाऊ शकता. त्यामुळे तुमची शुगर कंट्रोमध्ये राहू शकते तसेच त्यामुळे वजनही कमी होऊ शकते.
पचनक्रियेत थोडे बदल जाणवू शकतात
काहीजणांना भात खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो तर काहींसाठी ते गॅस किंवा बद्धकोष्ठतेचे कारण बनू शकते. जेव्हा तुम्ही भात खाणे सोडून देता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेचा अनुभव येऊ शकतो. तथापि, जर तुम्ही भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचे सेवन वाढवले तर तुमचे पचन लवकर सुधारेल.
उर्जा कमी वाटू शकते.
भात तात्काळ ऊर्जा प्रदान करतो. जेव्हा तुम्ही तो खाणे सोडून देता तेव्हा तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस थकवा किंवा सुस्ती जाणवू शकते. विशेषतः जर तुम्ही दिवसभर काम करत असाल किंवा व्यायाम करत असाल. तथापि, तुमचे शरीर उर्जेच्या नवीन स्रोतांशी जुळवून घेत असताना, ही कमतरता स्वतःच दूर होईल. हळूहळू, तुमच्या लक्षात येईल की तुमची ऊर्जा जास्त काळ टिकते आणि तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही.
पोषक तत्वांच्या कमतरतेचा धोका?
भातामध्ये व्हिटॅमिन बी असते, जे शरीराला ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. जर तुम्ही बराच काळ भात खाणे टाळले तर तुम्हाला या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे थकवा, मूड बदलणे किंवा विचित्र अन्नाची इच्छा होऊ शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही भात सोडता तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी पर्याय म्हणून तुम्ही हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी आणि दूध यासारखे पदार्थ तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करून घ्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List