ज्येष्ठांनाही स्क्रीनचे व्यसन, वृद्धांचा 50 टक्के वेळ टीव्ही, स्मार्टफोन आणि गेमिंग डिव्हाइसवर
केवळ किशोरवयीन मुलांनाच स्मार्टफोन, टीव्ही, व्हिडीओ गेमिंगचे व्यसन लागते, असे नव्हे. आता तर वृद्ध मंडळीही मोठय़ा प्रमाणात स्क्रीन ऑडिक्ट झाली आहे. ग्लोबल वेब इंडेक्सच्या (जीडब्ल्यूआय) अहवालानुसार, खरे स्क्रीन ऑडिक्ट आता वृद्ध बनत आहेत. ते आपला 50 टक्के वेळ टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि गेमिंग डिव्हाइसेसवर घालवत आहेत. 10 वर्षांत 50-60 वयोगटातील लोकांमध्ये सोशल मीडिया, गेमिंग, ऑडिओ स्ट्रीमिंगचा वेळ सतत वाढला आहे.
ब्रिटनच्या नॅशनल गेमिंग डिसऑर्डर सेंटरमध्ये नुकत्याच 72 वर्षांच्या एक वृद्ध महिला पोहोचल्या. त्यांना स्मार्टफोन गेमिंगचे व्यसन होते. आतापर्यंत या सेंटरमध्ये फक्त किशोरवयीन मुलेच स्क्रीनच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी येत. आतापर्यंत येथे 67 वृद्धांवर उपचार झाले.
हार्वर्ड मेडिकल स्कूलशी संलग्न मॅकलीन हॉस्पिटलच्या टेक अँड एजिंग लॅबचे प्रमुख इप्सित वाहिया म्हणतात, ‘‘वृद्धही किशोरवयीन मुलांसारखे फोनमध्ये जगत आहेत. हा बदल मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर त्याचा त्यांची झोप, शारीरिक हालचाल, मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.’’
दहा वर्षांत 60 टक्के वाढ
मागील दशकात वृद्धांमध्ये डिजिटल उपकरणांचा वापर झपाटय़ाने वाढला आहे. रिसर्च फर्म जीडब्ल्यूआयच्या अभ्यासानुसार 65 वर्षांवरील लोक आता
25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांपेक्षा जास्त टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही, ई-रीडर आणि कॉम्प्युटर वापरतात. टेक पंपन्यादेखील त्यांना लक्षात घेऊन उत्पादने बनवत आहेत. दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत 65 वर्षांवरील केवळ 20 टक्के लोकांकडे स्मार्टफोन होते. ही संख्या आता 80 टक्के झाली आहे.
तरुणांना टाकले मागे
निवृत्तीनंतर वृद्धांना वेळेची कमतरता नसते. पूर्वी हा वेळ पूजाअर्चा आणि टीव्ही पाहण्यात जात होता. आता स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटरचा वेळ वाढला आहे. ब्रिटनमध्ये 65 वर्षांवरील लोक रोज सरासरी तीन तास ऑनलाइन घालवतात. हा वेळ 18-24 वर्षांच्या तरुणांच्या तुलनेत निम्मा आहे, पण जेव्हा टीव्ही, स्मार्ट उपकरणे दोन्ही एकत्र पाहिली जातात, तेव्हा एकूण स्क्रीन टाइम तरुणांपेक्षा जास्त होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List