जेजुरी गडावर उसळली भाविकांची अलोट गर्दी
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर रविवारी हजारो भाविक व पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. गडावर मोठी रांग लागली होती. दोन ते अडीच तासांनी भाविकांचे दर्शन होत होते. दिवाळी संपल्यापासून गडावरील गर्दीत वाढ झाली आहे. आज गर्दीचा उच्चांक झाला. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांनी चार चाकी गाड्या उभ्या केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. सायंकाळी पाच वाजता जेजुरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने भाविकांचे हाल झाले. श्री खंडोबा देवाचे मूळस्थान म्हणून कडेपठारची ओळख आहे. या डोंगरावरही भाविक, मोठ्या संख्येने आले होते.
भाव वाढल्याने भंडार खोबऱ्यांची कमी उधळण
सध्या राज्यातच खोबऱ्याच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून मोठी वाढ झाल्याने गेले काही महिने भाविकांकडून गडावर भंडार, खोबरे उधळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवत आहे. गडावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे भाविकांचे दर्शन लवकर होण्यासाठी आज विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली.
चिंचेच्या बागेत चुलीवरच्या भाकरी व मटणाचा बेत
येथील होळकरांच्या ऐतिहासिक चिंचेच्या बागेमध्ये हजारो भाविक उतरले होते. या ठिकाणी भाविकांनी जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले. खंडोबा देवासाठी पुरणपोळी तर बानुदेवीसाठी मांसाहारी नैवेद्य बनविण्यात आले. या बागेत झाडाखाली चुली घालून त्यावर बाजरीच्या भाकरी व झणझणीत मटण असा बेत अनेक कुटुंबांनी तयार केला होता. भोजनासाठी पुणे शहर व जिह्यातून मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List