महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी, सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अटक करण्यात आली आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. तसेच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “पीडित कुटुंबाशी माझी चर्चा झाली आहे. सरकारने पारदर्शी एसआयटी नेमावी. कुठलाही राजकीय दबाव न येता पारदर्शक चौकशी करावी. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे.”
याआधी शुक्रवारी X वर एक पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List