महत्त्वाचे – विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू
पंढरपूर दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार कार्तिकी यात्रेत रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी विधिवत पूजा करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दि. 9 नोव्हेंबरपर्यंत (प्रक्षाळपूजा) 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. दर्शनरांगेत भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत.
एमपीएससीच्या समाजकल्याण अधिकारी परीक्षेत केदार गरड पहिला
नागपूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून केदार गरड पहिला तर वैभव भुतेकर दुसरा आला आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून सय्यद असीम सय्यद नजीर हा पहिला आला आहे. 19 मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती, मात्र आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर 18 ऑगस्टला ती घेण्यात आली होती.
परतीच्या प्रवासात मुंबईकरांची कोंडी
दिवाळीच्या सुट्टय़ा संपल्या असून अनेक शाळा-महाविद्यालये सुरू होत असल्याने गावी तसेच पर्यटनासाठी मुंबईबाहेर गेलेले कुटुंबकबिल्यासह परतू लागले आहेत. रविवारी पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातून मोठय़ा प्रमाणात लोक मुंबईकडे निघाल्याने मुंबई गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्प्रेस वे या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यात अनेक ठिकाणी महामार्गांच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने त्याचाही फटका वाहतुकीला बसला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List