नांदेडकरांना दिवाळी पहाटची मेजवानी, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल प्रमुख आकर्षण
गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील २० ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे यावर्षीचे दिवाळी पहाटचे आकर्षण असणार आहे.
२० ऑक्टोंबर सकाळी साडेपाच वाजेपासून प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सुश्राव्यगायन होणार आहे. यात भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत. प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम असून ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सह गायक म्हणून रविंद्र आहिरे मुंबई हे देखील यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ.गुंजन शिरभाते, सौ.आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे मान्यवर कलावंत सहभागी होतील.
२० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. शुभंम बिरकुरे व स्थानिक कलावंत यात सहभागी होतील.
२१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आधारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे. यात अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे व ईश्वरी जोशी हे सहकारी कलावंत सहभागी होतील.
बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कलांगण प्रतिष्ठाण प्रस्तूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ.कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, गायक सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी आदी मान्यवर गायक सहभागी होणार असून, या कार्यक्रमात वाद्यवृंदाची साथ राज लामटिळे, स्वप्नील धुळे, भगवानराव देशमुख, रविकुमार भद्रे, रतन चित्ते आदी करणार आहेत.
सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे. सतीश तांदळे यांचे दिग्दर्शन, संकलन व लेखन असलेला हा कार्यक्रम संगीतकार ऋषिकेश देशमाने यांच्या साह्याने रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण निखिल पुजारी आणि सतीश तांदळे हे करणार आहेत. तर कार्यक्रमात ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे आणि संपदा माने यांचे गायन होणार आहे. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असून, नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उपस्थितांना नम्र विनंती व आवाहन
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत आपण सढळ हाताने मदत करावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List