पोलिसांसाठीच्या ‘संस्कृती सबसिडियर कॅण्टीन’मध्ये 74 लाखांचा अपहार; कॅण्टीन व्यवस्थापक, हवालदार चांदणेवर गुन्हा दाखल
सांगली जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडियर कॅण्टीन’मध्ये 74 लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅण्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश चांदणे याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पोलिसांसाठी कॅण्टीन सुरू केले होते. कॅण्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल व वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या. कॅण्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षांपासून
कॅण्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला.
लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे ऍण्ड कंपनीने एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षाचे लेखापरीक्षण केले. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षात 28 लाख 94 हजार 812 रुपयांची तफावत आढळून आली. दोन वर्षांत 74 लाख 3 हजार 567 रुपयांची तफावत आढळल्याबाबत लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलीस कल्याण विभागाला सादर केला.
पोलीस कल्याणचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी हा अहवाल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी 30 मे 2025 रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरुण सुगावकर यांची नियुक्ती केली. त्यांनी 18 जून 2025 रोजी अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चांदणे याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List