ज्योती सुरेखा वेण्णमचा ऐतिहासिक पराक्रम! विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी तिरंदाज
हिंदुस्थानी तिरंदाज ज्योती सुरेखा वेण्णम हिने शनिवारी चीनमधील नानजिंग येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी फायनलमध्ये कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिली महिला कंपाउंड तिरंदाज ठरली, हे विशेष.
आशियाई पदकविजेत्या ज्योतीने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या एला गिब्सनविरुद्ध १५ पैकी १५ परफेक्ट शॉट्स मारत १५०-१४५ असा विजय मिळवला. त्याआधी, आठ तिरंदाजांच्या स्पर्धेत ज्योतीने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या अॅलेक्सिस रुईजला १४३-१४० ने हरवत दमदार सुरुवात केली. मात्र, उपांत्य फेरीत तिला अव्वल मानांकित मेक्सिकोच्या औंड्रया बेसेराकडून १४३-१४५ असा निसटता पराभव पत्करावा लागला.
ज्योती म्हणाली, ‘तिसऱ्या एंडनंतर मी एका गुणाने (८७-८६) आघाडीवर होते; पण औंड्याने चौथ्या एंडमध्ये तीन परफेक्ट १० मारले आणि शेवटच्या एंडमध्ये २९-२८ अशी झुंज देत मला मागे टाकले.’
कांस्यपदकाच्या लढतीत धमाकेदार पुनरागमन
ज्योतीने कांस्यपदकाच्या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी करत सलग १५ परफेक्ट १० मारले आणि एला गिब्सनला १५०-१४५ ने पराभूत करून आपल्या कारकिर्दीत पहिलं वर्ल्ड कप फायनल पोडियम फिनिश निश्चित केलं. याआधी, ज्योतीची दोन वेळा या स्पर्धेत कौशल्यपणाला लावले होते. ती २०२२ मध्ये ट्लॅ क्सकाला (मेक्सिको) आणि २०२३ मध्ये हाँसिलो (मेक्सिको) येथील स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती, मात्र त्या दोन्ही वेळा ती सुरुवातीच्या फेरीत बाद झाली होती. त्यामुळे ‘हा ऐतिहासिक पदकविजयाचा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये कांस्य जिंकणं हे माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचं सर्वात संस्मरणीय यश आहे,’ असे ज्योतीने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List