दिवाळी विशेष – मोठय़ा कुटुंबासोबत दिवाळी
वैभव जोशी, ज्येष्ठ कवी
दिवाळी पहाट ही संकल्पना श्रोता म्हणून आधी अनुभवली. सुरुवातीला शास्त्रीय संगीतातील दिग्गजांना दिवाळी पहाटेच्या निमित्ताने ऐकण्याचा हा अनुभव. अतिशय मांगल्यमय अशा वातावरणात दर्जेदार शास्त्रीय संगीत, गायन-वादन ऐकणं हा आपल्या संस्कृतीशी जुळून राहिल्याचा, नव्याने उजळणी केल्याचा अनुभव असतो. दिवाळी पहाटमध्ये कविता हा जरा उशिराने आलेला भाग. दिवाळीतील माझे कवितेचे कार्यक्रम म्हणजे घरातील सण सोडून जाणं असं मी मानत नाही. उलट मोठय़ा कुटुंबासोबत साजरी केलेली दिवाळी हे वेगळं समाधान मला मिळतं. हा रसिकांसोबत जुळलेला गोफ आहे. काव्यशास्त्रविनोदात रममाण होत एकत्र येत सण साजरा करताना दिवाळी पहाट हे निमित्त कलाकारांसाठी आणि रसिकांसाठीही संस्मरणीय अनुभव देणारे आहे. असा संस्मरणीय अनुभव लाभला संत कवयित्रींवर आधारित देवकी पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘अद्वैता’ हा कार्यक्रम सादर करताना. पंडीत फार्मवरील स्मरणात राहणारी ती दिवाळी पहाट होती.
दर दिवाळीला माझी एक कविता नव्याने समोर येते. ‘काळ जरी लिहीतो आहे, काळोखाची गाथा एक पणती लावून पहा, उजळ राहील माथा’. प्रत्येकाने एकेक जरी पणती लावली तरी सारा अंधार, कोलाहल दूर होईल. दिवाळीचा हाच खरा अर्थ अभिप्रेत असावा. माझ्यासाठी दिवाळीचा सगळा काळ भारल्यासारखा असतो. दिवाळीचे केवळ चार दिवसच नव्हे तर थंडी संपेपर्यंत टिकून राहणारी मनोवस्था म्हणजे दिवाळीचा काळ हे मला आधीपासून वाटत आले आहे. दिवाळीची चाहूल लागते ती पहाट संपून सकाळ होताना आणि सूर्यास्ताला पथदिप प्रज्वलित होताना. दिवाळी हा सोन्याचा सण. एका चित्रपटासाठी मी रचलेले गाणे जे या सोन्यासारख्या सणाचं प्रत्येकाला अभिप्रेत असणारं वर्णन असावं असं मी मानतो. पहाट नेसली पैठणी कोरी अंजिरी काठांची नक्षी साजिरी दाही दिशातून सोनेच सोने असं भासणारी दिवाळी सगळ्या रसिकांसाठी चैतन्यमयी ठरो. सोन्यासारख्या सणाच्या तितक्याच लखलखीत क्षणांनी ही दिवाळी साजरी होवो!
शब्दांकन : शुभांगी बागडे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List