नवलच! रांगोळी
>> अरुण
दिवाळीच्या दिवसात किंवा सणासुदीला, मंगलकार्यात रांगोळीची सजावट हे खास हिंदुस्थानी वैशिष्टय़. रांगोळी किंवा रंगावली देशात पूर्वापार सर्वत्र चितारली जाते. प्रत्येक दिवशी उंबरठय़ावर किंवा प्रवेशद्वाराबाहेर अथवा अंगणातल्या तुळशीवृंदावनासमोर रांगोळी घालणं ही पद्धत आजही सर्वत्र म्हणजे मुंबईसारख्या ‘अंगण नसलेल्या महानगरी घरांच्या प्रवेशद्वारातही पाहायला मिळते. रांगोळीमध्ये विविध प्रकारच्या कलाकृतींचा समावेश असतो. रांगोळीला विविध प्रादेशिक नावे आहेत. तामीळमध्ये ‘कोलम’, तेलुगूमध्ये ‘मुग्गु’, राजस्थानात ‘मंडाना’, बंगालमध्ये ‘अल्पना’ (उच्चार ‘ओल्पोना’) बिहारमध्ये ‘अरिपन’ किंवा ‘हरिपन’, ओडिशामध्ये ‘मुरूजा’, ‘जोथी’ किंवा ‘सित्रा’, पंजाबमध्ये ‘चौकपुराण’, गुजरातेत ‘गाहुली’, उत्तराखंडमध्ये ‘ऐपन’ आणि केरळमध्ये ‘पूक्कालम’ या नावांनी रांगोळी घातली/काढली/टाकली किंवा चितारली जाते.
याचा अर्थ असा होतो की, हिंदुस्थानी परंपरेत दारी रांगोळीची प्रसन्न सजावट हा जीवनाच्या सौंदर्यदृष्टीचे आणि मांगल्याचे प्रतीक असलेला अविभाज्य कलात्मक भाग आहे. दारी रांगोळी पाहून कुणाचंही मन आनंदीत होईल. आदिवासी संस्कृतीमध्येही घराच्या अंगणात रांगोळीसारखी पिठाची चित्रं आणि मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर बाहेरून रेखाटलेली सुंदर दृश्ये हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. वारली समाजाची अशी चित्रशैली तर आता जागतिक कीर्तीची झाली आहे.
शंखजिऱयाच्या, संगमरवरासारख्या दिसणाऱया दगडांची काही खरखरीत पूड म्हणजे शुभ्र रांगोळी. त्यात अनेक रंग मिसळून ‘रंगा’वली होते. अशा 100 ते 500 चौरस फुटांच्या रांगोळय़ा स्पर्धेत काढल्या जातात. ठिपक्यांचा छिद्र असलेला कागद घेऊन त्यावरून रांगोळीचे ठिपके टाकून, कागद काढून ते जोडल्यावर होणारी भौमितिक नक्षीची ‘ठिपक्यांची’ रांगोळी दिवाळीत दारोदार दिसते.
याशिवाय कुशल चित्रकार रांगोळीची अप्रतिम चित्रं आणि व्यक्तिचित्रंही रंगवतात. हे अतिशय कौशल्याचं आणि सहनशीलतेने (पेशन्स) करण्याचं काम आहे. मुंबईत पूर्वी गुणवंत मांजरेकरांच्या सर्व प्रकारच्या रांगोळय़ा प्रसिद्ध होत्या.
रांगोळीची माध्यमंही अनेक आहेत. रंगीत मण्यांची, फुलांची, कडधान्यातील डाळींची, सुटय़ा नाण्यांची असे कितीतरी आविष्कार रांगोळी रेखाटनात आढळतील. ही प्रथा देशात नेमकी कधी सुरू झाली सांगणं कठीण, पण प्राचीन वाङ्मयातही ‘रंगावली’चे उल्लेख येतात आणि या कलाकृती ही हिंदुस्थानची जगाला देणगी आहे हे लक्षात येतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List