दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून कोट्यावधी रुपये किंमत असलेली सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली. याप्रकरणी 4 जणांना अटक केली असून त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही जण आल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यांना त्या वाहनात व्हेल माशाची उलटी आढळून आली.
या कारमध्ये 4 संशयित आढळून आले. चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीसाठी दापोली येथील कस्टम्स कार्यालयात आणण्यात आले आणि आरोपींकडून माहिती घेण्यात आली. याप्रकरणी संशयित युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट (दाभोळ), निलेश साळवी (रत्नागिरी), सिराज शेख (मुंबई) यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यापैकी संजय धोपट हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस कर्मचारीच असा गुन्हा करत असतील तर सामान्यांनी कोणाकडे पाहावे अशी चर्चा सुरु आहे.
या कारवाईत सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणिक सिंग, मुख्य हवालदार सुहास विलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौऱ्या, हेमंत वासनिक सहभागी झाले होते. संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List