दसऱ्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता
केंद्र सरकार दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खूशखबर देण्याच्या तयारीत आहे. या वर्षी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय केंद्र सरकार लवकरच जाहीर करू शकते, ज्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होणार आहे. जुलै 2025 पासून केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवून देण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महागाई भत्त्यातील वाढ थेट मूळ वेतनावर परिणाम करते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. या वाढीमुळे पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे.
2025 साठी जुलैच्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. ही घोषणा अनेकदा दसरा किंवा दिवाळीच्या सणांच्या आसपास केली जाते, जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणांच्या आधी आर्थिक मदत मिळेल.
महागाई भत्ता (डीए) म्हणजे काय?
महागाई भत्ता (डीए) हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा एक प्रकारचा भत्ता आहे. त्याचा मुख्य उद्देश महागाईमुळे कमी होणाऱ्या त्यांच्या खरेदी क्षमतेची भरपाई करणे आहे. जेव्हा महागाई वाढते आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, तेव्हा कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखण्यासाठी हा भत्ता दिला जातो. सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी डीएमध्ये सुधारणा करते. या वेळेसची वाढ ही जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी असेल.
तीन महिन्यांची थकबाकी मिळणार
सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जेव्हा ही घोषणा केली जाईल, तेव्हा कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी (एरिअर्स) मिळेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List