जॉर्जियात असे काय घडले? हिंदुस्थानींच्या वाट्याला तुच्छतेची वागणूक, नाराजी व्यक्त
अलिकडच्या काळात विदेश दौऱ्याकडे हिंदुस्थानींचा कल वाढला आहे. तेथील संस्कृती, सौंदर्य पाहण्यासाठी लोक सहकुटुंब विदेश दौरा करतात. अशात युरोप आणि आशियाच्या मध्यभागी असलेले जॉर्जिया शहर हे सर्वाधिक पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. मात्र हिंदुस्थानींनी पसंत केलेलं पर्यटन त्यांनाच तुच्छ वागणूक देत असल्याचे आढळून आले आहे.
युरोपचे सौंदर्य, तेथील शहरे- संस्कृती पाहण्यासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांना अर्ध्यातूनच परतावे लागत असल्याचे समोर आले आहे. जॉर्जियन अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या वांशिक भेदभावाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही क्षुल्लक कारणावरून तरुणांना तासंतास त्यांची तपासणी करणे, तिबिलिसी विमानतळावर प्रवाशांची चौकशी करणे किंवा वैध कागदपत्रे असूनही प्रवेश नाकारणे, तसेच पर्यटकांना तासंतास ताब्यात ठेवून त्यांना आक्षेपार्ह प्रश्न विचारणे तर काहींना त्याच फ्लाइटमधून परत पाठवण्यात आल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
दरम्यान, या संदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत. यापैकीच एक प्रकरण ध्रुवी पटेल नावाच्या एका तरुणीने शेअर केले आहे. आर्मेनियामधून जॉर्जियामध्ये जाणाऱ्या 56 हिंदुस्थानी पर्यटकांच्या ग्रुपला जॉर्जियन अधिकाऱ्यांनी अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचा आरोप ध्रुवी पटेलने केला आहे. वैध ई-व्हिसा आणि कागदपत्रे असूनही, आमचा अपमान करण्यात आला आणि सदाखलो क्रॉसिंगवर बराच वेळ ताटकळत ठेवले.
ध्रुवी पटेलच्या दाव्यानुसार, त्यांना गोठवणाऱ्या थंडीत सदाखलो क्रॉसिंगवर पाच तासांहून अधिक काळ बसवण्यात आले. तेथे कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची किंवा शौचालयाची सुविधा दिली नाही. तसेच तेथील अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता आमचे पासपोर्ट दोन तासांपेक्षा जास्त काळ जप्त केले होते, असे तिने सांगितले. अशा पद्धतीची वागळूक जॉर्जियातर्फे हिंदुस्थानींना देण्यात आली.
दुसरे प्रकरण –
जानेवारी 2025 मध्येही अशीच एक घटना घडली. एका प्रवाशाने तिबिलिसीमध्ये आपला भयानक अनुभव शेअर केला. जिमीत वेद यांनी X वर या घटनेची माहिती शेअर केली आहे. शहराच्या ऐतिहासिक स्थळांमध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एक छोटी सुट्टी घालवण्याची अपेक्षा करत जिमीत एकटाच तिबिलिसीला गेला होता. परंतु प्रवासादरम्यानच त्याला अनेक भयंकर अनुभव आले.
Just another day for Indian passport holder trying to visit #Georgia for tourism.@Zourabichvili_S https://t.co/mDScqVBcKT pic.twitter.com/F281gatguW
— Backpacking Daku (@outofofficedaku) January 26, 2025
प्रवासादरम्यान इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत माहिती दिली. इमिग्रेशन अधिकारी त्याच्याकडे हॉटेल कन्फर्मेशन, सविस्तर छापील प्रवास कार्यक्रम, रोख रकमेचा पुरावा, परतीचे तिकीट आणि कंपनीचा आयडी यासह संपूर्ण कागदपत्रे असूनही त्यांच्यासोबत गैरवर्तन करत होते. त्यानंतर प्रवाशावर काहीतरी लपवल्याचा आरोप करण्यात आला आणि शेवटी त्याला प्रवेश नाकारण्यात आला. एवढेच नाही तर प्रवाशाला अपमानास्पद वागणूक आणि वर्णद्वेषी टीका करण्यात आली, असे प्रवाशाने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List