महापुराचे पाणी मृतदेह घेऊन आले! हिंदुस्थानच्या नावाने पाकिस्तानचा थयथयाट
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुराने थैमान घातले असून लाहोरसह अनेक शहरे व गावे पाण्याखाली गेली आहेत. या भयानक पुरासाठी पाकिस्तानने हिंदुस्थानला जबाबदार धरले आहे. ‘‘हिंदुस्थानमुळे हे संकट आले असून पुराचे पाणी मृतदेह घेऊन आले,’’ असा दावा पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ अली यांनी केला.
सियालकोट येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘‘जम्मूतून येणाऱया नद्यांच्या प्रदेशात सियालकोट वसलेले आहे. हिंदुस्थानने नद्यांचे पाणी सोडताच पाकिस्तानला नेहमीच पुराचा सामना करावा लागतो. या वेळीही तेच झाले आहे. हिंदुस्थानातून आलेले पुराचे पाणी मृतदेहांचे सांगाडे, गुरेढोरे आणि मलबा घेऊन आले आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत,’’ असे आसीफ अली म्हणाले. या पुरामुळे मागच्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
15 लाख लोकांना पुराचा फटका
मुसळधार पाऊस व हिंदुस्थानने धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रावी, सतलज व चिनाब नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे पाकिस्तानातील 1,432 गावे पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या पुराचा फटका 10 लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. तर अडीच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हा हिंदुस्थानचा पाणीहल्ला
हिंदुस्थानात उगम पावणाऱया अनेक नद्यांचा प्रवाह पुढे पाकिस्तानात जातो. मागच्या 60 वर्षांपासून सिंधू जल वाटप करारा अंतर्गत या पाण्याचे नियमन केले जाते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने हा करार स्थगित केला आहे. पाकिस्तानकडून आता त्याकडेच बोट दाखवले जात आहे. पाकिस्तानचे नियोजन व विकास मंत्री अहसान इकबाल यांनी हिंदुस्थानवर पाणीहल्ल्याचा आरोप केला आहे. ‘‘हिंदुस्थानने सोडलेल्या पाण्याची योग्य वेळी आणि पुरेशी माहिती दिली नाही. ही माहिती वेळीच मिळाली असती तर आम्हाला व्यवस्थापन करता आले असते. सिंधू जल वाटप करार अस्तित्वात असता तर मोठे नुकसान टाळता आले असते,’’ असे इकबाल म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List