टॅरिफमुळे हिंदुस्थानला 52 लाख कोटींचे नुकसान, छोट्या उद्योगांना मोठा झटका; लाखो नोकऱ्यांवर गंडांतर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानला जोरधार झटका बसला आहे. टॅरिफमुळे हिंदुस्थानला तब्बल 55 ते 60 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 52 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे, हा दावा ब्रोकरेज फर्म जेफरीजचे इक्विटी स्ट्रेटजी ग्लोबल हेड क्रिस्टोफर वुड यांनी केला आहे. वूड यांनी आपल्या साप्ताहिक न्यूजलेटर ग्रीड अँड फियर या सदरात हा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे ज्या सेक्टर्सला सर्वात जास्त फटका बसणार आहे. त्यामध्ये टेक्सटाईल, फुटवेअर, ज्वेलरी अँड जेम्स, कापड उद्योग, सीफूड उद्योगांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आर्थिक मंदीसुद्धा येऊ शकते, असा इशारा वूड यांनी दिला आहे. ते म्हणाले की, चालू आर्थिक तिमाहीतील जीडीपीची ग्रोथ रेट केवळ 8 टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर काही वर्षांपूर्वी ही आकडेवारी 10 ते 12 टक्क्यांदरम्यान होती. 2025 मधील 10 टक्क्यांची ग्रोथ ही आर्थिक वर्ष 2026 पर्यंत कमी होऊन 8.59 टक्के होऊ शकते, असे म्हटले आहे. पुढील आर्थिक संकट रोखण्यासाठी केंद्र सरकार आतापासून पावले उचलत आहेत. सरकारने आधी बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये कपात केली. त्यानंतर आता जीएसटीमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे.
छोटय़ा उद्योगांवर संकट
अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफमुळे सर्वात मोठा फटका हा छोटय़ा उद्योगांना बसणार आहे. मोठय़ा लिस्टेड कंपन्यांवर याचा थेट परिणाम होणार नाही, परंतु जे छोटे आणि मध्यम उद्योग धंदे आहेत त्यांना जबर फटका बसू शकतो. हे उद्योग बंद पडू शकतात. यामुळे लाखो लोक बेरोजगार होण्याची भीती आहे. जर हा टॅरिफ बऱयाच कालावधीसाठी राहिला तर जीडीपी 11.2 टक्क्यांपर्यंत घटू शकतो.
मोदींकडून मौन
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अन्य देशांच्या तुलनेत मोठा म्हणजेच तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, परंतु ट्रम्प यांच्या या टॅरिफवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप मौन पाळले आहे. मोदी यांनी टॅरिफ थेट बोलणे टाळले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील युद्ध माझ्यामुळे थांबले असा दावा वारंवार केला आहे यावरसुद्धा पंतप्रधान मोदी यांनी बोलणे टाळले आहे. मोदी यांच्या मौनावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पुढे येऊन बोलावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदी यांना दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List