आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!

 आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!

मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलकांचे तुफान आझाद मैदानावर धडकले. मुसळधार पाऊस असतानाही मराठा आंदोलकांनी एकीची वज्रमूठ दाखवत सरकारला निर्वाणीचा इशाराच दिला. आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी घोषणाच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. मला गोळ्या घाला, समाजासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, मात्र डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असा इशारा देत जरांगे यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून आज आंदोलक आझाद मैदानावर धडकले. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करून त्यांनी सरकारवर घणाघात केला. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना यावेळी केले. लोकशाही कायद्यानुसारच आंदोलन होणार. तुम्ही गोळ्या घाला, मी झेलायला तयार आहे. तुरुंगात टाका, मी तिथेही उपोषण करीन. मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही.  मुंबईत मराठे येतच राहतील. यावरच मराठे थांबणार असून आगामी काळात आठ टप्प्यांत आंदोलन करण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलक एकत्र आले. रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकाने अंगावर डिझेल ओतून घेतलं होतं. मात्र वेळीच आंदोलनकर्त्याला थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.

डबेवाल्यांचा मराठ्यांना पाठिंबा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबई डबेवाला असोसिएशननेही पाठिंबा दिला असून डबेवाल्यांचे शिष्टमंडळाने आझाद मैदानावर जरांगे यांची भेट घेतली. डबेवाल्यांमध्ये 99 टक्के मराठा समाजातील आहेत. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा देत बारा जणांचे शिष्टमंडळ आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा पाणीही सोडणार

जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर दिवसभरात सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेतली नाही. त्यामुळे सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्या, यानंतर आपण पाणीदेखील पिणार नाही, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.

सरकार सकारात्मक – अजित पवार

शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आंदोलनाची वेळ कोणावरही येऊ नये  सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काळजी करु नका, सरकार सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सीएसएमटी स्थानकावर गोंधळाची स्थिती

सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने आझाद मैदानात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आलेले शेकडो मराठा आंदोलक स्थानकावरच थांबले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी स्थानक दणाणून सोडले. मात्र प्रचंड गर्दीमुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. याचा फटका घरी परतणाऱ्या मुंबईकरांना बसला.

हे सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार

मराठा समाज आझाद मैदानात आले असतान परिसरातील  स्वच्छतागृहे बंद करण्यात आली. साधे पाणीही मिळणे कठीण झाले. त्यामुळे हे सरकार इंग्रजांपेक्षाही बेक्कार असल्याची जोरदार टीका जरांगे पाटील यांनी केली. इथे आल्यावर मिळालेली वागणूक मराठे नेहमीच लक्षात ठेवेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

सरकारची भूमिका सहकार्याचीच – फडणवीस

‘लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास आमचा विरोध नाहीय. सरकारचीही सहकार्याची भूमिका आहे’, असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘मनोज जरांगेंनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं तर, आमचा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाहीय. कारण, बऱ्याच ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागलंय. लोकांना याचा त्रास होऊ नये, तसेच कुणीही आडमुठेपणानं वागू नये’, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. उच्च न्यायालयानं आम्हाला बंधनं घालून दिली आहेत. त्यांच्याबाहेर आम्हाला जाता येणार नाही. तसेच कायद्याच्या चौकटीतच राहून आम्हाला विचार करावा लागणार आहे’. असेही ते म्हणाले.

एनडीएचे खासदारही रेड्डींना मते देतील

उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. सुदर्शन रेड्डी यांनी नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे आणि संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे उपराष्ट्रपतीच देशाला हवे आहेत, असे मत त्यांनी मांडले. उपराष्ट्रपती पदासाठी गोपनीय मतदान असले तरी ज्यांच्या हृदयात देशप्रेम आहे असे एनडीएचे खासदारसुद्धा देशासाठी रेड्डी यांना मतदान करून निवडून देऊ शकतात, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आजही आंदोलन, पोलिसांची परवानगी

आंदोलनासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र यापुढेही सरकारने सहकार्य करावे आणि बेमुदत उपोषणाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यावेळी जरांगे यांनी केली. दरम्यान, आझाद मैदान पोलिसांनी मराठा आंदोलनाला आणखी एक दिवस वाढीव परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्या शनिवारीदेखील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र हे आंदोलन पोलीस-प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करून करावे, अशी अटही परवानगी देताना घालण्यात आली आहे.

आम्ही शांततेत आलो आहोत, पण जर सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आम्ही आमच्या लेकराबाळांसह मुंबईत येऊ. मुंबई जाम करू, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे. आरक्षण दिले तर मराठा समाज सरकारला विसरणार नाही. – मनोज जरांगे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोरेगावच्या चित्रनगरीत छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा गोरेगावच्या चित्रनगरीत छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारा देखावा यंदा गोरेगावच्या ‘चित्रनगरी’ने साकारला आहे. जागतिक वारसा...
बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती, पालिकेकडून 300 ठिकाणी सुविधा; 30 हजारांवर मूर्तींचे विसर्जन
मोबाईलवर गेम खेळणाऱ्या, चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आता चाप बसणार
मुख्य सचिव राजेश कुमार यांना मुदतवाढ
मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका
Duleep Trophy – औकिब नबीच्या हॅटट्रिकमुळे उत्तर विभाग भक्कम, उत्तर विभागाकडे 175 धावांची जबरदस्त आघाडी
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून सध्या संपूर्ण देशात संशयाचे वातावरण, शरद पवार यांचे प्रतिपादन