मुद्देमाल द्यायला पोलीस मालकाच्या दारी
आशिष बनसोडे, मुंबई
प्रवासात आपला किमती ऐवज चोरीला गेला की तो परत मिळेलच याची काही शाश्वती नसते, परंतु रेल्वे पोलीस हा समज खोडून काढत प्रवाशांचा मुद्देमाल त्यांना परत मिळवून देत आहेत, मात्र अनेक जण विविध कारणे सांगत आपला परत मिळत असलेला किमती ऐवज घ्यायलाच जात नाहीत. असे चित्रदेखील असून त्याला छेद देत रेल्वे पोलीस मुद्देमाल द्यायला संबंधित मालकांच्या दारी जात आहेत.
प्रवासात आपला किमती ऐवज चोरीला गेला अथवा हरविल्यास त्याची रीतसर तक्रार पोलिसांत दिली जाते. मग पोलीस त्यानुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करतात व चोरीचा ऐवज परत मिळवून तो न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधिताला परत करतात. असे असले तरी अनेक तक्रारदार आपला मोबाईल, सोन्याचे दागिने अथवा अन्य ऐवज ताब्यात घेण्यासाठी संबंधित रेल्वे पोलीस ठाण्यात जात नाहीत. परिणामी मालक येईल याची वाट पाहत तो ऐवज पोलीस ठाण्यात तसाच ठेवला जातो, परंतु एस राकेश कलासागर यांनी रेल्वे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कुठलाही मुद्देमाल आपल्याकडे न ठेवता तो संबंधिताला तत्काळ परत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरीचा ऐवज शोधून काढण्याबरोबर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित मालक त्याचा मुद्देमाल घेण्यास येत नसल्यास त्याचा पत्ता शोधून त्याला घरी जाऊन देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत शेकडो जणांना पोलिसांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन मुद्देमाल परत करण्याची कामगिरी केली आहे.
मालक येत नसल्याने…
गेल्या सहा महिन्यांत रेल्वे गुन्हे शाखेने अडीचशेहून अधिक मोबाईल शोधून काढले त्यापैकी 100 हून अधिक मोबाईल पोलिसांनी संबंधितांच्या घरी जाऊन दिले, तर दादर रेल्वे पोलिसांनी 253 मोबाईल मालकांना परत केले. त्यापैकी 18 जणांना त्यांच्या घरी जाऊन परत दिले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी 100 हून अधिक जणांच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल, लॅपटॉप, सोने, रोकड आदी ऐवज परत केला आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांनीदेखील अनेकांच्या घरी जाऊन चोरीचा मुद्देमाल परत केला आहे.
विविध कारणांमुळे मालक आपला ऐवज परत मिळत असतानाही तो घ्यायला पोलिसांकडे जात नाही, परंतु पोलिसांनी मात्र ज्याचा ऐवज त्याला परत करायचाच असा जणू चंग बांधला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांत जाऊनदेखील रेल्वे पोलीस मुद्देमाल संबंधिताला परत देत आहेत. लवकरच एका गुह्यातील दुचाकी कुर्ला रेल्वे पोलीस पुलवामा येथे जाऊन मूळ मालकाला परत करणार आहेत. मुद्देमाल परत करताना छायाचित्र काढणे, पंचनामा करणे नियमाने बंधनकारक असल्याने ही सर्व प्रक्रिया पोलिसांना पूर्ण करावी लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List