21 हजार ठेवीदाराची 450 कोटींची फसवणूक, ‘सिस्पे कंपनी’च्या संचालकांवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. ‘सिस्पे कंपनी’, ट्रेंडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कथित फायनान्स कंपन्यांनी अधिक परताव्याचे आमिष दाखवून पारनेर तालुक्यातील २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.१) पहाटे कंपनीच्या संचालक मंडळावर सुपा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा, मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विनोद गाडीलकर (रा. माळवाडी, वाघुंडे, ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विनोद गाडीलकर यांची २०२२ मध्ये नगरमधील एका कार्यक्रमात कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना एक दिवस पुण्यात बोलावून घेतले. तेथे त्याने कंपनीचा सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन घर, ययाती मिश्रा यांची ओळख करून दिली. या सर्वांनी ट्रेंडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कंपनीची सविस्तर माहिती सांगून गुंतवणुकीतून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादीसह पारनेर तालुक्यातील अनेकांची पंचतारांकित हॉटेलमध्ये मिटिंग घेऊन मोठमोठे आमिष दाखविले. त्यामुळे फिर्यादीसह अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना विश्वास बसावा म्हणून काही दिवस कसाबसा १० ते ११ टक्के परतावा दिला. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने परतावा देणे बंद केले.
सुपा व परिसरातील गुंतवणूकदारांची प्रथम सिस्पे नंतर ट्रेंडज इन्व्हेस्टमेंट,इन्फीनाईट बिकन मल्टिस्टेट या नावाच्या कंपन्या सुरू करून शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली आणि १० ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. या कंपनीकडूनही गुंतवणूकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत.
कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे नाव बदलले आहे. परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत. सॉफ्टवेअर दुरुस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणूकदारांना काही दिवस झुलवत ठेवले होते. नंतर काही दिवसांपूर्वी कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत, अशी खात्री झाल्याने गुंतणूकदारांनी एजंटांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, एजंटांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीसह अन्य गुंतवणूकदारांनी जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर वरील सर्वांवर सुपा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामध्ये मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये असलेले अनेक कर्मचारी जादा परताव्याच्या अमिषापोटी अडकले आहेत. शुक्रवारी या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. तसेच, आता पैसे कसे मिळतील, याची चिंता लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List