Kolhapur news – न्यायालयाने निर्देश दिल्यास ‘महादेवी’ पुन्हा नांदणीत परतणार!
शिरोळ तालुक्यातील नांदणीच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानकडील ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ हत्तिणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये नेण्यात आले आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले, तर ‘वनतारा’कडून ‘महादेवी’ला पुन्हा नांदणी मठाच्या स्वाधीन करण्यात येईल. शिवाय शक्य झाल्यास नांदणीच्या मठामध्ये वनताराचे एक युनिटदेखील सुरू करण्याची तयारी वनताराच्या सीईओंकडून सुरू असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जनभावनेचा रेटा पाहता, सर्वोच्च न्यायालयात आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत, अशी भूमिका आबिटकर यांनी मांडल्याने नांदणीकरांची लाडकी ‘महादेवी’ हत्तीण परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नांदणीच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानाकडे गेली 33 वर्षे असलेल्या ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ या हत्तिणीला ‘पेटा’च्या तक्रारीनंतर गुजरातच्या वनतारा हत्ती संगोपन केंद्रात पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; पण हत्तिणीची पाठवणी केल्यानंतर याविरोधात नांदणीकरांनी नाराजी व्यक्त करीत, ‘जिओ’ विरोधात मोहीम उघडली होती. याची दखल घेत आज वनतारा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान कराणी यांच्यासह पथक विमानतळावर दाखल झाले. पण नांदणी परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याने पथकाला नांदणीमध्ये जाता आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाचे मठाधिपती, ‘पेटा’ संस्थेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. नांदणी परिसरातून शेकडो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दीड तास झालेल्या चर्चेनंतर बैठक पूर्ण होण्याआधीच मठाधिपती बैठकीतून बाहेर पडल्याने नेमकी चर्चा काय झाली, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
ही बैठक संपल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. ‘महादेवी’ हत्तिणीला परत करण्याची मठाधिपती यांनी सीईओंकडे मागणी केली; पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यास ‘महादेवी’ला परत करण्याची तयारी ‘वनतारा’ने दर्शविली आहे, असे आबिटकर यांनी सांगितले.
तीव्र जनभावनेने महायुतीचे लोकप्रतिनिधी धास्तावले
हत्तिणीच्या विरहामुळे गेल्या पाच दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील नांदणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ‘जिओ’ नेटवर्कविरोधात मोहीम तीव्र केली आहे. घडाघड मोबाईल नंबर पोर्ट करण्यात येत आहेत. याबाबत फोनवरील संभाषणाच्या ध्वनिफिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या आहेत. शालेय विद्याथ्यांकडूनसुद्धा जोपर्यंत ‘महादेवी’ हत्तीण परत येत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून नांदणी मठास ‘महादेवी’ हत्तीण पूर्ववत मिळावी, यासाठी प्रयत्न होत असल्याने जिल्ह्यातील महायुतीचे नेते धास्तावल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मांचा आदर करीत या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कोल्हापूरकरांच्या भावना वनतारा हत्ती संगोपन केंद्रापर्यंत पोहोचविल्या. त्यानंतर तत्काळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘पेटा’ संस्थेचे अधिकारी आज कोल्हापुरात दाखल झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List