गद्दार पैशाने विकला जाऊ शकतो, पण निष्ठावान नाही; उद्धव ठाकरे कडाडले, शेतकरी क्रांती संघटना शिवसेनेमध्ये विलीन
अनेक जण शिवसेना संपवायला निघाले. उद्धव ठाकरे संपवायला निघाले. एवढे करूनही ठाकरे संपत का नाही? कारण सर्वच माणसं पैशाने विकले जात नाहीत. गद्दार पैशाने विकले जात असतील, पण निष्ठावान नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मातोश्री’ येथे शनिवारी शेतकरी क्रांती संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विलीन करण्यात आली. शेतकरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष गजानन बिल्लेवार यांचे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपण मोठी केलेली माणसं गेली, पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत. आयुष्यात प्रामाणिकपणा विकत घेतला जाऊ शकत नाही. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. मुख्यमंत्री असताना नागपूरचे अधिवेशन झाले. त्यावेळी कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन कर्जमाफी करा अशी मागणी केली नव्हती. मात्र शेतकऱ्याला झुलवत ठेवण्यापेक्षा, अन्नदात्याचे आपण काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी जेवढे करू तेवढे केले पाहिजे या भावनेला जागून मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही घडले ते अनाकलनीय आहे. असा निकाल लागेल असे आपल्याला कुणाला वाटत नव्हते. मला खात्री आहे, महाराष्ट्राची जनता एवढी उपराठी नाही. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींमध्ये अनेक बापे घुसले आहेत. हे कुणी घुसवले? पैसे कुठे गेले? लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला जात असून कसेतरी ओढून ताणून सर्व सुरू आहे. मोठे स्वप्न दाखवले, लोक त्याला भुलले, पण आता निवडणूक झाल्यावर त्यांचे खरे स्वरुप दिसतेय.
शेतकरी क्रांती संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विलीन #shivsenaubt #uddhavthackeray #saamana pic.twitter.com/bC0MWmFElC
— Saamana Online (@SaamanaOnline) August 2, 2025
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष वरचढ ठरला. संसदीय अधिवेशनातही विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करत आहे. कारण मुद्देच तसे आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर आपण पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. पण राजीनामा घ्यायच्या ऐवजी त्यांना समज देण्यात आली. धुळ्यातील रेस्ट हाऊसमध्ये पकडलेल्या रोकडची चौकशीही थंडावली. पैशांच्या बॅगेसह मंत्र्याचा व्हिडीओ समोर आला त्याचीही चौकशी नाही, असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारचे वाभाडे काढले.
आज एक कार्टून आले आहे. त्यात रमी आणि तीन पत्ती ऑलिम्पिकमध्ये घेण्याची मागणी होईल, असे म्हटले आहे. कारण पहिल्यांदा जो विषय आहे, त्या प्रमाणे खाते दिले गेले असावे. कृषिमंत्री असताना कोकाटे शेतकऱ्यांची थट्टा, मस्करी करत होते. आता रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला. म्हणजे बघा हे सरकार कसे चालले आहे. एवढा हतबल मुख्यमंत्री कधी पाहिला नाहीय. त्यामुळे हे सगळी भ्रष्टाचाराने विदृप झालेले चेहरे आपल्याला लोकांसमोर न्यावे लागली. यासाठी लवकरच राज्यभर आंदोलन करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List