शेकापचा 78 वा वर्धापन दिन; पनवेलमध्ये आज भव्य मेळावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विजय वडेट्टीवार, शशिकांत शिंदे प्रमुख अतिथी
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन उद्या शनिवारी पनवेल मध्ये साजरा करण्यात येणार आहे. खांदा कॉलनी येथील गुरुद्वाराशेजारील पोलीस मैदानावर सकाळी 10.30 वाजता शेकापचा मेळावा होणार आहे. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी शहरी भागासह गावागावात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. हा मेळावा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा, उमेद निर्माण करणारा ठरेल असे सांगतानाच यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक प्रा. व्ही. एस. जाधव, कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोर्डे, अतुल म्हात्रे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडीप्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा सरचिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, शंकरराव म्हस्कर यांच्यासह वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
जय्यत तयारी
या मेळाव्याची गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू आहे. मंडपापासून पार्किंग व्यवस्था, आसन व्यवस्था अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला व तरुणवर्ग या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List