भीमाशंकरला ‘व्हीआयपी’ दर्शन बंद करा! भाविकांची मागणी
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिना सुरू झाल्यापासून पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी विविध क्षेत्रांतील अधिकारी न येता, त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने ‘व्हीआयपी’ दर्शनासाठी येतात. त्यांच्या दर्शनामुळे रांगेत सात ते आठ तास उभे असलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे देवस्थान व प्रशासनाने यांची स्वतंत्र व्यवस्था करावी अन् श्रावण यात्राकाळातील अभिषेक बंद करावेत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. शनिवार, रविवार, सोमवार व इतर सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी एक ते दीड किलोमीटर दर्शनासाठी रांगा लागतात. मात्र, सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी दर्शनरांगेत सात ते आठ तास उभे असताना अन् विविध क्षेत्रांतील अधिकाऱ्यांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते यांना वाहनतळापासून ते मंदिरापर्यंत देवस्थान ट्रस्टच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने त्वरित दर्शनाची सोय केली जाते. त्यावेळी दर्शनरांग थांबविण्यात येते. तर, काहीजण अभिषेक करण्याचा आग्रह धरतात. या प्रक्रियेता बराच वेळ लागतो. त्यामुळे दर्शनरांगेत तासन्तास बोचरी थंडी, संततधार पाऊस यामध्ये उभे असलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना दर्शन मिळत नाही अन् ‘व्हीआयपी’ दर्शनामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने व प्रशासनाने ‘व्हीआयपीं’च्या दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी किंवा श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणारे सर्व व्हीआयपी, दर्शनरांगेतील भाविक या सर्वांसाठी बाहेरून दर्शनाची सोय करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List