मुंबई-दुबई स्पाइसजेट फ्लाइटला 10 तासांहून अधिक विलंब, प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
मुंबईहून दुबईला जाणारी स्पाइसजेटची आंतरराष्ट्रीय फ्लाइट (एसजी) रविवारी तांत्रिक कारणांमुळे तब्बल 10 तासांहून अधिक काळ विलंबाने उड्डाण करू शकली. हे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहाटे 1:50 वाजता उड्डाण करणार होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते थांबवण्यात आले. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत माहिती देताना स्पाइसजेटच्या व्यवस्थापनाने सांगितले की, विमानाला तांत्रिक समस्यांमुळे विलंब झाला. प्रवाशांना या विलंबाची माहिती देण्यात आली होती, परंतु वेळ वाढत गेल्याने आणि स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा संयम सुटला. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतरही फ्लाइटबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी विमानतळावर निदर्शने केली. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना आणि स्पष्टीकरण मागताना दिसत आहेत.
प्रवाशांनी तक्रार केली की, इतक्या विलंबादरम्यान विमानतळावर त्यांना पाणी, जेवण यासारख्या मूलभूत सुविधाही पुरवण्यात आल्या नाहीत. दरम्यान, या घटनेमुळे स्पाइसजेटच्या सेवांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही स्पाइसजेटच्या अनेक विमाने तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना घडल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List