लाराप्रेमाचा विजय असो…

लाराप्रेमाचा विजय असो…

>> मंगेश वरवडेकर 

खरं तर क्रिकेट हा जंटलमन गेम. काळाच्या ओघात त्याचं हे सज्जन रूप बदललं. क्रिकेटपटूंची वृत्ती बदलली. मानसिकता बदलली. क्रिकेटचा आत्मा भटकेल, असे असंख्य प्रकारही मैदानात घडू लागले. घडताहेत अन् पुढेही घडत राहणार. पण खेळात स्पर्धा-संघर्ष पावलोपावली असला तरी खिलाडूवृत्तीही असल्याचे स्फूर्तिदायक चित्र सोमवारी दिसले. अवघ्या जगाने ती पाहिली आणि त्या वृत्तीला, प्रेमाला मानाचा मुजराही केला.

खेळ म्हटलं की विक्रम हा आलाच. मुळात विक्रम हा मोडण्यासाठीच असतो आणि तो मोडला जावा म्हणून सारेच खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतात. मोडल्यावर जल्लोष करतात. मोडण्यात अपयश आल्यावर निराशही होतात. रागाच्या भरात गैरवर्तणूकही करतात. पण सोमवारी बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात जी खिलाडूवृत्ती दिसली, जे प्रेम दिसले त्याला तोड नाही. लारा हा महान क्रिकेटपटू आहे आणि कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विश्वविक्रम त्याच्याच नावावर अबाधित राहावा म्हणून दक्षिण आफ्रिकन हंगामी कर्णधार विआन मुल्डरने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. क्रिकेटच काय, कोणत्याही खेळाच्या मैदानात असे क्षण दुर्लभ झालेत.

परवा मुल्डरने एकाच दिवसात 264 धावा चोपून काढल्या तेव्हाच तो त्रिशतक ठोकणार, हे निश्चित झालं होतं. म्हणून त्याची बातमी ‘मुल्डर त्रिशतकाच्या उंबरठ्य़ावर’ अशीच केली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुय्यम दर्जाचा संघ खेळविल्यामुळे या सामन्याकडे पुणाचेच फारसे लक्ष नव्हते, पण मुल्डरच्या खेळीमुळे ते वेधले गेले. मुल्डरने सोमवारी अपेक्षेप्रमाणे त्रिशतक साजरे केले. मात्र शतकानंतर त्याचा झंझावात त्या खेळीला वेगळय़ाच दिशेने घेऊन गेला. त्याने पहिल्या सत्रातच आपल्या धावसंख्येत 103 धावांची भर घालत अनेक विक्रमांना मोडीत काढले होते. मात्र उपाहाराला 15-20 मिनिटे असताना तो काहीसा शांत झाला. त्याने 31 चेंडूंत 67 धावा ठोकल्या होत्या. यात 11 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. तेव्हा ब्रायन लाराचा विक्रम आज मोडला जाणार असे स्पष्ट जाणवत होते. मात्र तेव्हा अचानक विआनच्या मनात काहीतरी वेगळे घडायला सुरुवात झाली होती. त्याने चौकार-षटकार ठोकणे अचानक थांबवले. तो चक्क एकेरी धाव काढून कायल वेरेनला फलंदाजी देऊ लागला. उपाहारापूर्वीच्या चार षटकांत तो केवळ चार चेंडू खेळला आणि प्रत्येक चेंडूवर एकेरी धावच काढली. त्यामुळे तो उपाहाराला खेळ थांबला तेव्हा 367 धावांवर नाबाद होता. उपाहारानंतर तो पुन्हा मैदानात उतरेल आणि लाराचा 21 वर्षांपूर्वीचा 400 धावांचा विश्वविक्रम मोडेल, असे सारे अंदाज बांधू लागले होते. पण या गृहस्थाने आपले लाराप्रेम दाखवत दक्षिण आफ्रिकेचा डाव घोषित केला. त्याचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यकारक आणि अनपेक्षित वाटला. पण त्याची प्रतिक्रिया ऐकल्यावर जाणवलं की तो लाराचा भक्त आहे, लाराप्रेमी आहे. 400 धावांचा विक्रम हा लाराच्या नावालाच शोभेसा आहे. त्याच्यापुढे आपण जाऊ नये, अशी त्याची भावना त्याचे लाराप्रेम दाखवणारीच नव्हती, तर एक अद्भुत खिलाडूवृत्तीही ठरली. त्याने डोळय़ांसमोर असलेला विश्वविक्रमला लाराप्रेमासाठी अबाधित ठेवला. तो एवढ्यावरच थांबला नाही. भविष्यात पुन्हा अशी संधी आली तर मी पुन्हा हेच करेन, असेही तो आदराने म्हणाला. याला काय म्हणावे?

काही विक्रमवेडे मुल्डरच्या या भावनेला मुर्खात काढतील, पण मुल्डर हा मूर्ख नाही. तो उपाहारानंतर पुन्हा मैदानात उतरला असता तर काहीही घडले असते. पण त्याने दाखवलेल्या प्रेमाचे कौतुक व्हायलाच हवे. त्याने दाखवलेली खिलाडूवृत्ती आता अजरामर झालीय. त्याच्या या प्रेमाने मार्प टेलरच्या ब्रॅडमनप्रेमाची आठवण ताजी केली. 1998 च्या पाकिस्तानविरुद्धच्या पेशावर कसोटीत टेलर 334 धावांवर नाबाद होता. त्याने ब्रॅडमन यांच्या सर्वोच्च खेळीची बरोबरी साधली होती. त्याला ब्रॅडमनना मागे टाकण्याची संधी होती, पण त्याने मागे टाकले नाही. तेव्हा तोच कर्णधार होता. त्याला हे शक्य होते. पण टेलरने ब्रॅडमनबरोबर थांबण्यातच धन्यता मानली. कारण तो ब्रॅडमनप्रेमी होता. त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी मुल्डरने केलीय. सामना संपला तरी खेळ संपलेला नाही. काही गोष्टी नुसत्या डोळय़ांनी दिसत नाहीत. त्या मनाला जाणवतात. मुल्डरचा ही वृत्तीही आकडय़ांत किंवा शब्दांत मोजता येणार नाही. त्याच्या लाराप्रेमाने, त्याची आगळय़ा दृष्टीने एक वेगळा दृष्टिकोन दिसलाय. जाणवलाय. एवढेच म्हणेन, खेळाच्या सीमारेषा असतात. पण खिलाडूवृत्तीच्या नाही. अशा खिलाडूवृत्तीचा विजय असो. लाराप्रेमाचा विजय असो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्यावर दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर परिणाम होऊ...
दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम
‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा खाताय जास्त मीठ, ताबोडतोब प्रमाण करा कमी
दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
हिंदुस्थान 5 वर्षांनी पुन्हा चिनी पर्यटकांना देणार व्हिसा देणार, 24 जुलैपासून करता येईल अर्ज
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हत्येचा कट, 70 वर्षीय महिलेला अटक
IND vs ENG 4th Test – ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता