अखेर ब्रिटनचे फायटर जेट मायदेशी झेपावले, तांत्रिकी बिघाडामुळे 14 जूनपासून केरळमध्ये लटकले
केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिन्याहून अधिक काळ अडकून पडलेले ब्रिटिश एफ-35 फायटर जेट अखेर ब्रिटनच्या दिशेने झेपावले आहे. या अत्याधुनिक विमानाला तांत्रिक बिघाडामुळे केरळमध्ये मोठा थांबा घ्यावा लागला होता.
14 जून रोजी हे स्टेल्थ जेट खराब हवामान आणि इंधनाच्या कमतरतेमुळे रॉयल नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स या विमानवाहू नौकेवरून वळवण्यात आले होते व ते केरळमध्ये उतरले. या लढाऊ विमानात हायड्रोलिक बिघाड झाल्याचे समोर आले. लँडिंग गियर, ब्रेक्स आणि कंट्रोल सरफेस यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये बिघाड झाला होता. ब्रिटिश अभियंते मागील अनेक दिवसांपासून हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते.
एफ-35 फायटर जेटचा हा अनपेक्षित आणि लांबलेला मुक्काम सर्वांसाठी कुतूहलाचा विषय बनला होता. सुरुवातीला हे जेट मोकळ्या जागेत उभे होते, नंतर ते एका हँगरमध्ये हलवण्यात आले. या घटनेवर आधारित अनेक मीम्स तयार सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुवातीला हायड्रोलिक बिघाड इतका मोठा होता की, जेटचे भाग काढून ते मालवाहू विमानाने परत पाठवावे लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र 6 जुलै रोजी रॉयल एअर फोर्सची टीम स्पेअर पार्टस् आणि उपकरणांसह एअरबस ए400एम अॅटलासने येथे पोहोचली व त्यानंतर विमान केरळमध्येच दुरुस्त करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List