छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण पोलिसांना शरण, तत्काळ जामीन मंजूर
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण हे पोलिसांना शरण आले होते. त्यांच्यासह दहा कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्यात हजर झाले होते. पहाटे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना जामीन देखील मंजूर झाला.
राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. लातूरमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकून याबाबत जाब विचारला. तेव्हा सूरज चव्हाण यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. तेव्हापासून राज्यभरात छावा संघटनेकडून विविध ठिकाणी आंदोलनं तसेच सूरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी केली जात होती.
दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा सूरज चव्हाण हे त्यांच्या दहा कार्यकर्त्यांसह लातूर पोलीस ठाण्यात शरण आले होते. त्यानंतर त्यांना पहाटे न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथे त्यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला. सूरज चव्हाण पोलिसांना शरण येण्याबाबत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गुप्तता बाळगण्यात आल्याचे बोलले जात आहे. सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाल्यानंतर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना त्यांच्या शरणागतीची माहिती दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List