कोपरगावातील 64 इमारती धोकादायक! नगरपालिकेकडून मालकांना नोटिसा
शहरातील तब्बल 64 इमारती, घरे धोकादायक बनल्या आहेत. मान्सूनपूर्व आपत्तिव्यवस्थापनाअंतर्गत नगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने चारजणांच्या पथकाने केलेल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. या 64 जणांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजाविल्या आहेत.
मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित इमारतींमुळे दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबरच मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या 64 मालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती, घरे गावठाण भागात आहेत. या धोकादायक इमारती उतरवून घ्याव्यात, असे नोटिशीतून म्हटले आहे.
धोकादायक इमारतींचे मालक आणि त्यातील कुळांना त्याबाबत कळविण्यात आले आहे. काही इमारतींबाबत न्यायालयीन दावे सुरू आहेत. अत्यंत धोकादायक इमारतीच्या मालकांना अंतिम नोटिसा बजाविल्या आहेत. धोकादायक शक्य तितक्या इमारती उतरून घेण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. पडाऊ असलेल्या इमारतींचा पडाऊ भाग पडल्यास व त्यापासून काही जीवित अगर वित्तीय हानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालक, जागामालक, भोगवटादार, भाडेकरू यांचीच राहील, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात पूर येऊन आपली घरे नागरिकांचे आर्थिक नुकसान व जीवितहानी झाल्यास त्यास नगरपरिषद अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देता येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी आपली असणार, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकाऱयांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List